पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५
महाराष्ट्राची पृथगात्मता
 

तिसऱ्या शतकात मगधप्रांती फार मोठा दुष्काळ पडला होता. त्या वेळी भद्रबाहूच्या नेतृत्वाखाली हजारो जैन लोक महाराष्ट्रात येऊन राहिले. दीर्घ काळ येथे राहिल्याने यांनी येथल्या महाराष्ट्री भाषेतच ग्रंथरचना केली. जैनांचे बहुतेक सर्व कथावाङ्मय हे महाराष्ट्री भाषेतच आहे. तिला जैन महाराष्ट्री म्हणतात. पण ती महाराष्ट्रीच होय असे हर्मन जाकोबीसारख्या पंडितांनी म्हटले आहे. जैन धर्म सर्व भारतात पसरला आहे. तेव्हा महानुभवांच्या धर्मप्रसारामुळे ज्याप्रमाणे मराठीचा प्रसार महाराष्ट्राबाहेर पंजाब, काबूलपर्यंत झाला त्याचप्रमाणे जैनांच्या धर्मग्रंथांमुळे महाराष्ट्रीचा सर्व भारतात प्रसार झाला हे उघड आहे.

प्राकृत शिलालेख
 महाराष्ट्री ही महाराष्ट्राचीच भाषा होय हे सिद्ध करण्यासाठी केवळ पंडितांच्या भाषाशास्त्रीय पुराव्यावरच अवलंबून राहण्याचे कारण नाही. सातवाहन वंशाचे राज्य महाराष्ट्रावर इ. पू. २५० पासून इ. पू. दुसऱ्या शतकापर्यंत होते. आणि या सातवाहनांचे नाणेघाट, कारला, कान्हेरी, नाशिक येथील सर्व शिलालेख महाराष्ट्रीत आहेत. या लेखांतून सातवाहनांच्या पराक्रमाचे वर्णन महाराष्ट्रीत - प्राकृतात केलेले आहे. गौतमीपुत्र सातकर्णी हा 'सकयवनपल्हव निसूदन' होता, 'खखरातवस निखसेसकर' होता असे त्याचे वैभव प्राकृतात गायिले आहे. त्याची माता गौतमी बलश्री हिचेही वर्णन असेच आहे.

सत्तसई
 यापेक्षाही बलवत्तर व निःसंदेह पुरावा म्हणजे हाल सातवाहन या राजाने रचलेला गाथा सत्तसई – सप्तशती - हा ग्रंथ होय. हा ग्रंथ म्हणजे सुभाषितांचा कोश आहे. आणि हाल राजाने अनेक ग्रंथांतून व लोकांच्या पाठांतून ही सुभाषिते, या गाथा, संग्रहीत केल्या आहेत. अनेक ग्रंथांतून या गाथा वेचल्या याचा अर्थच हा की यापूर्वी महाराष्ट्री भाषेत अनेक ग्रंथ झाले असले पाहिजेत. आणि लोकांच्या पाठांतून या गाथा वेचल्या, यावरून महाराष्ट्री ही त्या वेळी लोकभाषा होती हे उघड आहे. महाराष्ट्री भाषेतील या सत्तसईमध्ये गोदावरी, सह्याद्री यांचा अनेकवार उल्लेख येतो. त्यामुळे तिची रचना महाराष्ट्रात झाली व ते त्या काळच्या महाराष्ट्रजीवनाचे वर्णन आहे यात शंका नाही. वर निर्देशिलेले शिलालेख इ. पू. दुसऱ्या, पहिल्या शतकातले आहेत. तर सत्तसईची रचना इ. स. पहिल्या शतकातली आहे. यावरून इ. पू. ३ ऱ्या ४ थ्या शतकापासून महाराष्ट्री ही महाराष्ट्राची लोकभाषा होती हे निःसंशय दिसते. वरुचीचा काळ इ. स. पू. १ ले २ रे शतक असा मानला जातो. त्या काळी त्याने प्राकृत भाषांचे व्याकरण लिहिले व त्यात महाराष्ट्रीला प्राधान्य दिले. व्याकरण लिहून त्यात या भाषेचा गौरव करावा अशी संपन्नता महाराष्ट्रीला त्या वेळी प्राप्त झाली होती, असे