पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०३
अर्थमूलो हि धर्मः ।
 

सुलतान यमयातना देत असे. त्यामुळे मिरासदारांना शेतकऱ्यांची दया आली तरी तिचा काही उपयोग नसे. तेच पाटील, देशमुख यांचे. अशा स्थितीत ग्रामसंस्था किंवा देशक या असून नसून सारख्याच झाल्या. यामुळे गावेच्या गावे ओस पडली. प्रजा परागंदा झाली आणि या भूमीवर खरा प्रलयान्त ओढवला.

अराजक
 पण प्रजाजनांचे दुर्दैव एवढ्यावर संपत नसे. या मनसबदारांत, या देशमुखांत, जहागिरदारांत वतनासाठी नित्य मारामाऱ्या चालत, नित्य लढाया आणि रक्तपात चाले आणि त्यामुळे मुलखात कायमचे अराजक माजलेले असे. ज्याला आपले वतन वाढावे असे वाटे तो बेदरला किंवा विजापूरला जाऊन तशी सनद घेऊन येई. पण त्या सनदेची अंमलबजावणी कोण करणार ? तो स्वतः आणि त्याचे भाईबंद ! सुलतानांचे काम फक्त सनद देणे, पुढची व्यवस्था ज्याने त्याने पाहावयाची. याशिवाय कुलाभिमान, देशमुखांचे मानापमान, सण-उत्सवाच्या वेळी पहिल्या जागेविषयीचे मानापमान, सोयरिकीवरून होणारे मानापमान यामुळेही रक्तपात होत. शेजवलकरांनी या रक्तपातांची वर्णने दिली आहेत ती वाचून अंगावर काटा येतो. 'जेधे बेदराहून फर्मान घेऊन येत आहेत हे ऐकून खोपडे आधीच तयार होतात व त्यांना खिंडीत गाठून गारद करतात. त्यातून एखादा निसटतो तो माणसे जमवून आणतो आणि खोपड्यांची कत्तल करतो. या कत्तलीतून बायका, मुले, दाया, कुणबिणी याही सुटत नाहीत. खून व त्याचा बदला म्हणून प्रतिखून हे तर वंशपरंपरा चाले. काही वेळा उघड निरोप पाठवून व मोक्याच्या ठिकाणी रणखांब रोवून झुंजायाचा दिवसही ठरवीत. त्याप्रमाणे बांदलाचे साडेबाराशे लोक जेध्यांच्या सातशे लोकांशी लढले. या लढाईत काहींचा निर्वंश झाला. (संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, पृ. १५-१६)

राज्याचे दायाद
 वतनदारी, मनसबदारी, मोकासा पद्धती, मक्तेदारी, सरंजामदारी या पद्धतीचा अर्थ काय ते यावरून ध्यानात येईल. यामुळेच आज्ञापत्रात अमात्यांनी त्यांना राज्याचे दायाद- शत्रू- म्हटले आहे. अमात्य म्हणतात, 'राज्यातील वतनदार, देशमुख, देश- कुळकर्णी, पाटील आदी करून यांस वतनदार म्हणावे. हे स्वतंत्र देशनायकच होत. सार्वभौमापासून बलन्यूनतेने उतरती परंपरा बळवंत राखोन, दुर्बल वर्ततच आहेत. परंतु त्यास साधारण गणावे असे नाही. हे लोक म्हणजे राज्याचे दायादच आहेत. आहे वतन इतकियावर कालक्रमणा करावी, राजाशी एकनिष्ठेने वर्तावे, कोणाचा अन्याय न करावा ही त्यांची बुद्धी नाही. जब तव नूतन संपादावे व बळकट व्हावे, बळकट झाले म्हणजे एकाचे घ्यावे, दावे परवडे करावे हा यांचा सहज हव्यास. परचक्र आले म्हणजे वतनाच्या आशेने अगोदर सलूख करतात, स्वतः भेटतात, तिकडील भेद इकडे, इकडील