पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४०२
 

सर्व जानपदस्थ लोकांचा समावेश असे. यांतील बहुतेक सर्व लोक वतनदार असत. गावचा एकंदर कारभार सर्वांच्या अनुमतीने होत असे.

देशक
 गावच्या जमिनीची सर्व व्यवस्था पाहणे, पडीक जमिनी लागवडीस आणणे, जंगलातून नव्या पिकाऊ जमिनी निर्माण करणे, चोराचिलटांपासून पिकांचे व गावाचे रक्षण करणे, दुष्काळ, लढाया, परचक्रे यांमुळे मुलूख उजाड होई, जमीन ओस पडे, वस्ती उठून जाई, ही सर्व वस्ती पुन्हा जागी आणणे आणि जमिनी पुन्हा लागवडीस आणण्याची व्यवस्था करणे हे देशकाचे काम होते. गावावर टोळखाद येई, रोगराई येई, दरवडे पडत, अतिवृष्टी- अनावृष्टी या आपत्ती येत. या प्रसंगी योग्य उपाय- योजना करून गावाचे रक्षण करणे हे काम देशकाचे असे. जमिनीवरून, गुराढोरा वरून व इतर अनेक कारणांनी गावात तंटे होत. ते सोडून न्याय करणे हेही देशकाचेच काम असे. याचाच अर्थ असा की प्रत्येक गाव हे एक लहानसे प्रजासत्ताक होते.

मिरासदारी
 मुस्लिम सत्ताधाऱ्यांनी ही व्यवस्था मुळात बदलली नाही. पण आपल्या मुलखाचे निरनिराळे विभाग करून त्याचे मोकासे निरनिराळ्या मुस्लिम व मराठा सरदारांना देऊन टाकले. मोरे, सुर्वे, सावंत, मोहिते, निंबाळकर हे असेच सरदार किंवा मनसबदार होते. आपापल्या मुलखातून ठराविक रक्कम सुलतानांकडे भरली की आपल्या परगण्यात ते स्वतंत्र राजेच होते. मुस्लिम सुलतान, त्यांचा पैसा त्यांना मिळाल्यावर त्यांच्या कारभारात कधीच लक्ष घालीत नसत. अशा रीतीने अनियंत्रित सत्ता हाती आल्यावर हे मिरासदार किंवा वतनदार काय धुमाकुळ घालीत असतील याची कल्पना करणे फारसे अवघड नाही. सभासदाने या अंदाधुंद कारभाराचे वर्णन करताना म्हटले आहे, 'इदलशाही, निजामशाही, मोगलाई (यांनी) देश काबीज केला त्या देशात मुलकाचे पाटील, कुळकर्णी यांचे हाती व देशमुखांचे हाती कुलरयत यांनी कमाविशी करावी आणि मोघम टक्का द्यावा. हजार दोन हजार जे गावी मिरासदारांनी घ्यावे, ते गावी दोनशे तीनशे दिवाणात (सरकारला) खंड मक्ता द्यावा. त्यामुळे मिरासदार पैकेकरी होऊन गावास हुडे, वाडे, कोट बांधून, प्यादे बंदुकी ठेवून बळावले.' (सभासद बखर, कलम ३३) मक्तेदारीमुळे प्रजेवर केवढा जुलूम होत असेल याची यावरून कल्पना येईल. सुलतानाचा खंड दोनशे असला तर मिरासदार दोन हजार वसूल करणार. पण तो स्वतः केव्हाच वसुलीला जात नसे. त्याचे कामगार म्हणजे देशमुख आणि त्यांचे सेवक म्हणजे पाटील, कुळकर्णी तेव्हा प्रत्येकजण वसूल करताना आपली तुंबडी भरून घेणार हे उघडच आहे. सुबत्ता असो, दुष्काळ असो, सुलतानाला खंड दिलाच पाहिजे. नाहीतर मिरासदारांना पकडून नेऊन त्यांना