पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०१
अर्थमूलो हि धर्मः ।
 

 तशी पावले टाकून त्यांनी जी आर्थिक क्रांती घडविली तिचे रूप आता पहावयाचे आहे.

नवी अर्थव्यवस्था ?
 मुस्लिम सत्ताधारी हिंदुप्रजेचा कमालीचा रक्तशोष करीत असत हे वर सांगितलेच आहे. पण अपहार, लूटमार एवढेच त्या शोषणाचे रूप नव्हते. मुस्लिमांची राज्यव्यवस्था, सर्व राज्यकारभार आणि सर्व अर्थव्यवस्था ही शोषणाच्या पायावरच उभारलेली होती. सरंजामी पद्धती, मनसबदारीचा कारभार, वतनदारी या नावांनी जी प्रसिद्ध आहे तीच ही राज्यव्यवस्था व अर्थव्यवस्था होती. शिवछत्रपतींनी ही सरंजामी वतनदारी अर्थव्यवस्था नष्ट केली, असे आज बरेच पंडित सांगतात. सभासदाची बखर आणि रामचंद्रपंत अमात्य यांचे आज्ञापत्र यांतील अनेक उताऱ्यांवरून त्यांचे हे म्हणणे पुष्कळ अंशी खरे आहे, असे दिसते. पण महाराजांनी वतनदारी नष्ट केली नाही, त्यांना तसे करणे शक्यही नव्हते, असाही एक पक्ष आहे. आणि या पक्षानेही भरपूर कागदपत्रे सादर केलेली आहेत. या दोन्ही पक्षांचे प्रतिपादन लक्षात घेऊन छत्रपतींनी कोणती अर्थव्यवस्था प्रस्थापित केली ते आता निश्चित करावयाचे आहे.

वतनदारी
 राजाने आपल्या राज्याची अनेक सुभ्यांत किंवा परगण्यांत विभागणी करून ते परगणे निरनिराळ्या सरदारांच्या ताब्यात द्यावयाचे आणि त्या सरदारांनी वा मनसबदारांनी त्या त्या सुभ्यात जवळ जवळ स्वतंत्रपणे कारभार करून राजाला दरसाल ठराविक रक्कम महसूल म्हणून द्यावयाची आणि स्वतःच्या खर्चाने लष्कर नित्य तयार ठेवून युद्धाच्या प्रसंगी राजाच्या स्वारीबरोबर जातीने जाऊन लढाया करावयाच्या, असा ढोबळपणे सरंजामी पद्धतीचा अर्थ होतो. सरंजामदारी, मनसबदारी, वतनदारी या शब्दांचा तांत्रिक दृष्टीने काही भिन्न अर्थ असला तरी भावार्थ हाच आहे.

ग्रामसंस्था
 मुसलमान पूर्व काळात भारतात सरंजामी पद्धती नव्हती. भारतातील राजनीति - निपुणांनी सर्वत्र शासनव्यवस्था उत्तम असावी या हेतूने ग्रामसंस्था निर्माण केली होती. ही ग्रामसंस्था म्हणजे प्रत्येक गावचे एक लहानसे प्रजासत्ताक असे आणि त्याचा कारभार ग्रामपंचायत नावाची सभा करीत असे. मध्ययुगात ही व्यवस्था थोडी पालटली आणि ग्रामीण भागात देशकसत्ता आली. देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी, चौगुला आणि प्रमुख ग्रामस्थ या सर्वांना मिळून देशक असे म्हणत. गावाच्या कारभारासाठी ज्या सभा भरत त्यांत बारा बलुतेदार, शेतकरी, जोशी या
 २६