पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४००
 

तो तरी कशासाठी ? तो आपले रक्षण करील, आपले घरदार, जमीन आपल्या जवळच राहील व सुखाने दोन घास खाता येतील, अशी राज्यव्यवस्था तो करील, ही त्यांना आशा असते. मुस्लिम राज्यात हे घडत नव्हते. अगदी दुष्काळाच्या काळात फक्त मुस्लिम प्रजेच्या अन्नपाण्याची व्यवस्था सत्ताधारी आधी करीत आणि हिंदूंना वाऱ्यावर सोडीत. मग एरवीच्या काळी काय असेल याची सहज कल्पना येईल. आपले भोगविलास निर्वेध चालविण्यासाठी लागणारे जे धन ते निर्माण करणारे गुलाम, हमाल, मजूर एवढ्याच दृष्टीने मुस्लिम सत्ताधारी हिंदुप्रजेकडे पाहत असत. त्यामुळे दैन्य, दारिद्र्य, दुःख, अन्नान्नदशा, जीवितवित्ताची अशाश्वती, स्त्रियांच्या अपहरणाची, विटंबनेची कायमची भीती हाच हिंदूंचा ललाटलेख मुस्लिम आमदानीत होऊन बसला होता. अशा स्थितीत हिंदूंना जो राजा हवा होता तो धर्मरक्षणाबरोबरच जीवित-वित्ताचे, घरादाराचे, भाकरीचे रक्षण करील असा हवा होता. शिवछत्रपतींनी आरंभापासून तेच कार्य करण्याचे धोरण अवलंबिले. म्हणूनच महाराष्ट्र त्यांना अवतारी पुरुष मानू लागला.

अर्थशास्त्र
 मागे एकदा सांगितलेच आहे की शिवछत्रपतींनी ग्रंथ लिहिले नसले तरी क्रांतीचे तत्त्वज्ञान त्यांनी मनाशी पूर्णपणे निश्चित केले होते. अर्थमूलो हि धर्मः । हे चाणक्याचे वचन कधीही दृष्टिआड होऊ दिले नव्हते. शाइस्तेखानाच्या स्वारीच्या प्रसंगी एकदा आपल्या सचिवांना उद्देशून ते म्हणाले, 'अर्थामुळेच सर्व कामे साधतात आणि अर्थामुळेच धर्माची अभिवृद्धी होते. म्हणूनच पैशाची प्रशंसा करतात. कुल, शील, वय, विद्या, पराक्रम, सत्यवादित्व, गुणज्ञता, गांभीर्य ही सर्व पैशामुळेच प्राप्त होतात. अर्थामुळेच लोकांना इहलोक आणि परलोकही लाभतो. द्रव्यहीन पुरुष हा जिवंत असूनही नसल्यासारखाच असतो. ज्याच्याजवळ विपुल पैसा असतो त्यालाच मित्र लाभतात, ज्याच्याजवळ पैसा असतो तोच पराक्रमी होतो आणि ज्याच्याजवळ पैसा असतो त्यालाच सर्व लोक साह्य करतात.' (शिवभारत, २८, ३६-३९)
 भारतातील प्राचीन ऋषिमुनींनी अर्थाचे हे माहात्म्य चांगले जाणले होते. चाणक्य तर यासाठीच प्रसिद्ध होता. पण महाभारतातही ठायी ठायी हे विचार निरनिराळ्या पुरुषांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळतात. 'धन मिळवणे हाच श्रेष्ठ धर्म होय. धनावरच सर्व काही अवलंबून आहे, धनसंपन्न लोकच जगात जिवंत असतात, धनहीन लोक मेल्यातच जमा होत.' 'धनाच्या योगाने कुळाचा उत्कर्ष होतो. धन असेल तर धर्माची वाढ होते- धनात् धर्मः प्रवर्धते ।- निर्धनाला इहलोकही नाही आणि परलोकही नाही'. असे धनाचे तत्त्वज्ञान प्राचीन भारतात धर्मवेत्ते मुनीही सांगत असत. शिवछत्रपतींनी महाभारताचे उत्तम श्रवण केले होते. त्यामुळेच धर्मक्रांतीबरोबरच आर्थिक क्रांतीही केली पाहिजे, तीवाचून धर्मक्रांती दीर्घकाळ टिकणे शक्य नाही, हे मनाशी दृढपणे ठरवून त्यांनी पहिल्यापासूनच त्या दृष्टीने पावले टाकली होती.