पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२०.
अर्थमूलो हि धर्मः ।
 



 श्री शिवछत्रपतींनी जी धार्मिक क्रान्ती महाराष्ट्रात केली तिचे स्वरूप आपण पाहिले. मुसलमानी राज्यात, उत्तरेत आणि दक्षिणेतही हिंदुधर्म आणि हिंदुप्रजा यांवर अत्यंत भयानक असे अत्याचार होत होते. आणि हिंदुधर्म समूळ नष्ट करून सर्वत्र इस्लामचा प्रसार करावयाचा अशी मुस्लिम सत्ताधाऱ्यांची प्रतिज्ञाच होती. अशा स्थितीत, एक पराक्रमी पुरुष हातात खङ्ग घेऊन हिंदुधर्माच्या रक्षणासाठी पाय रोवून उभा राहिला आहे, हे पाहताच हिंदु-प्रजाजनांना अपरिमित आनंद झाला, यात शंकाच नाही. आणि त्यामुळेच, सावंत, सुर्वे, मोहिते, घोरपडे, माने, निंबाळकर इ. मोठमोठे सरदार जरी छत्रपतींविरुद्ध होते तरी, सामान्य हिंदू जनता सत्वर त्यांच्या पाठीशी उभी राहिली, हे उघड आहे.

भाकरीचे रक्षण
 पण एवढ्याने भागले नसते. स्वराजाची पायाभरणी करण्यात आणि त्यावर एका मागून एक चालून येणाऱ्या विजापुरी सरदारांना पराभूत करून हाकलून देण्यात छत्रपतींना जे अल्पावधीत यश आले ते केवळ धर्मप्रेरणेने आले असते असे वाटत नाही. सामान्य जनांना धर्माभिमान नसतो असे नाही. पण पोटापाण्याची, भाकरीची, पोराबाळांच्या संरक्षणाची त्यांना जास्त चिंता असते. आपल्या जातीचा, धर्माचा राजा असावा अशी मनोमन त्यांना इच्छा असते, आकांक्षा असते, हे खरे. पण