पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३९८
 

स्वतः येथून ते निघून गेले असा जनमानसात रूढ समज होता. आता ते सर्व पालटले. आता मराठ्यांच्या राज्याला, स्वराज्याला परमेश्वराचा आशीर्वाद आहे, त्याचीच महाराजांच्यावर कृपा आहे, हे राज्य देवब्राह्मणांचे आहे, असे उद्गार सर्वत्र निघू लागले. रामचंद्रपंत आमात्य यांच्या आज्ञापत्रात, 'श्रीस राजाचा व स्वामींचा पूर्ण अभिमान', 'दिनप्रतिदिनी या राज्याची अभिवृद्धी व्हावी ही ईश्वरी इच्छा बलवत्तर', 'श्रीकृपाकटाक्षाने यवनांचे प्रयत्न निष्फळ झाले' अशी वचने ठायी ठायी आहेत. छत्रपती राजाराम आपल्या एका पत्रात म्हणतात, 'हे महाराष्ट्र राज्य म्हणजे देवाब्राह्मणांचे राज्य आहे.' शंकराजी नारायण सचिव म्हणतात, 'हे राज्य देवाब्राह्मणांचे आशीर्वादाचे आहे.' अनाजी जनार्दन सुभेदार-वाई यांनीही, 'हे मऱ्हाठे राज्य म्हणिजे देवाब्राह्मणांचे आहे,' असाच निर्वाळ दिला आहे. पेशव्यांच्या बखरीत, शंभर दीडशे वर्षांनीसुद्धा, हीच श्रद्धा दिसून येते. बखरकार म्हणतो, 'यवनांचे पारिपत्य करून हिंदुधर्म स्थापावा याजकरिता शिवाजी महाराज यांजवर श्रींचा कृपानुग्रह झाला. त्यांनी श्रीरामेश्वरापासून गोदावरीपर्यंत धर्मस्थापना केली.'
 समर्थांचे वचन तर प्रसिद्धच आहे. या भूमंडळाचे ठायी, धर्म रक्षी ऐसा नाही, महाराष्ट्रधर्म राहिला काही, तुम्हांकरिता ॥ हे वचन किती खरे होते ? औरंगजेबाने आदिलशहाला लिहिले होते की शिवाजीचे पारिपत्य झाले नाही तर मुसलमानी राज्ये बुडतील !

धर्म म्हणजे...
 शिवछत्रपतींनी धर्मक्रांती केली म्हणजे काय ते यावरून ध्यानात येईल. धर्म म्हणजे व्रतवैकल्ये, श्राद्धपक्ष, तीर्थयात्रा, भजनपूजन नव्हे, तर धर्म म्हणजे यवनांचे पारिपत्य म्लेंच्छांचा उच्छेद आणि स्वराज्याची स्थापना, धर्म म्हणजे समाजाच्या परंपरेचे, वैभवाचे रक्षण, लोकांचा उत्कर्ष-प्रभव. त्यासाठीच धर्माची स्थापना असते. धर्म म्हणजे मरगळलेल्या मनात चैतन्य निर्माण करणे, समाजाची आत्मश्रद्धा जागी करणे, आणि लोकांना पराक्रमाची, विश्वविजयाची प्रेरणा देणे. हे मानसिक परिवर्तन हीच खरी क्रांती होय. शिवछत्रपतींनी हे तिचे तत्त्वज्ञान मनाशी सिद्ध करून त्याला स्वतःच्या आचरणाने प्रत्यक्ष, मूर्त रूप दिले आणि या मराठ्यांच्या भूमीत जीवकळा निर्माण केली.
 धर्मक्रांती हे मानसिक परिवर्तन होय. त्यामुळे चैतन्य निर्माण होते, नवा उत्साह येतो व माणसे पराक्रमाच्या कोटी करतात. पण त्या पराक्रमातून प्रत्यक्ष जीवनात सुखाचा लाभ झाला नाही तर त्या क्रांतीला अर्थ राहात नाही. अर्थमूलो हि धर्मः । असे चाणक्याने म्हटले आहे ते याच अर्थाने. शिवछत्रपतींनी हे निश्चित जाणले होते. म्हणूनच धर्मक्रांतीबरोबर आर्थिक क्रांतीचाही उद्योग त्यांनी आरंभिला होता. त्याचे स्वरूप आता पाहू.