पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३९६
 

असा बुद्धीनिश्रय असल्यामुळे त्यांनी शास्त्राचा हा आत्मघातकी निर्बंध मोडून काढला आणि कोकणात जलदुर्ग बांधून आरमाराची स्थापना केली. 'नवे करावे हे या कुलात जन्मल्याचे सार्थक,' अशी त्यांची धारणाच होती. त्यानी नुसते आरमार स्थापन केले एकढेच नव्हे, तर समुद्रगमनाचा पायंडा स्वतः घालून दिला. १६६५ साली ८५ शिवाडे व ३ गलबते घेऊन त्यांनी वेदनूरचे मुख्य बंदर जे बसरूर त्यावर जातीने स्वारी केली आणि सुरतेप्रमाणे तेथून अपार धन मिळविले. ही स्वारी करून समुद्रगमन, परदेशगमन हे हिंदुधर्मीयांना पूर्ण विहित आहे, असा सिद्धान्त पुन्हा नव्याने त्यांनी प्रस्थापित केला.

(५) पतितपरावर्तन
 शास्त्रीपंडितांनी रूढविलेल्या आत्मघातकी (अ) धर्मशास्त्राचे निर्मूलन करून, शिवछत्रपती धर्माच्या सर्व क्षेत्रांत कसे पुरोगामी धोरण अवलंबीत होते, ते आपण पाहत आहो. पतितपरावर्तन किंवा धर्मांतरितांची शुद्धी हे असेच क्षेत्र किंवा धर्माचे अंग होते. कलिवर्ज्य प्रकरणाने ज्याप्रमाणे समुद्रगमन निषिद्ध ठरविले आणि हिंदूंचा अःधपात घडविला त्याचप्रमाणे, शुद्धिबंदीचा दंडक घालून देऊन, हिंदुधर्माला व हिंदुसमाजाला कायमचा क्षय लावून ठेविला.

स्मृतिकार देवल
 इ. सनाच्या आठव्या शतकापूर्वी भारतावर अन्यधर्मीयांची आक्रमणे झाली नव्हती. शक, यवन, हूण, युएची इ. परकीयांची आक्रमणे झाली. पण एक तर त्यांना स्वतःच प्रगत विकसित असा धर्म नव्हता आणि दुसरे म्हणजे या सर्व आक्रमकांचे निर्दालन करून हिंदुधर्मीयांनी त्यांना हिंदुधर्माची दीक्षा दिली व पूर्णपणे आत्मसात करून टाकले. इ. स. ७११ मध्ये महंमद कासिमाने सिंध प्रांतावर स्वारी करून तो प्रदेश जिंकला व हजारों हिंदूंना बळाने वाढविले. तेव्हा पतितांच्या, बाटलेल्यांच्या शुद्धीचा, पतितपरावर्तनाचा प्रश्न येथे प्रथमच निर्माण झाला. पण त्या वेळी हिंदू धर्मशास्त्रज्ञ सावध होते. देवल ऋषींनी नव्या स्मृतीची रचना करून पतितांची शुद्धी करण्यास अनुकूल असे धर्मशास्त्र सांगितले आणि तशी शुद्धी अनेक ठिकाणी घडवूनही आणली. पण पुढे कलिवर्ज्याच्या कर्त्याने, वर सांगितल्याप्रमाणे, पतितपरावर्तन निषिद्ध मानले आणि बळाने धर्मांतरित झालेल्यांनाही हिंदुधर्माची द्वारे बंद करून टाकली. पुढे अनेक शतके धर्मक्रांती करण्याचे धैर्य व सामर्थ्य असलेला नेता हिंदुसमाजाला न मिळाल्यामुळे हिंदुसंख्येचा क्षय होतच राहिला. याने शेवटी या समाजाचा संपूर्ण विनाश ओढवेल हे जाणून महाराजांनी ते धर्मशास्त्र रद्द ठरवून पतितांना हिंदुधर्माची द्वारे पुन्हा मोकळी करून दिली.