पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३९५
मराठा काल
 

मूढ, अविवेकी शास्त्रीपंडित समाजाला अधःपातास नेईल, असाच धर्म सांगत राहिले. 'शूद्रकमलाकर' हा ग्रंथ लिहिणारा कमलाकर भट्ट, शुद्धितत्त्वकार रघुनंदन, 'व्रात्य- प्रायश्चित्तचिंतामणी' लिहिणारा नागेश भट्ट हे धर्मशास्त्रकार याच वर्गातले होते. श्रीकृष्ण, व्यास, भीष्म यांच्या धर्माच्या व्याख्या वर दिल्या आहेत. त्याअन्वये पाहता धर्म हा शब्द उच्चारण्याची सुद्धा त्यांची पात्रता नव्हती. पण विनाशकाले विपरीत बुद्धिः । अशी हिंदुसमाजाची अवस्था होऊन या समाजाने या मूढांचे धर्मशास्त्रच वंद्य मानले. आणि ते जवळजवळ सहाशे वर्षे !

ब्रह्मक्षत्र
 शिवछत्रपतींचे अलौकिकत्व हे की ते जसे महापराक्रमी होते तसेच, वर सांगितल्याप्रमाणे, तत्त्ववेत्तेही होते. म्हणून त्यांनी कलियुगात क्षत्रिय नाहीत या घातकी कल्पनेचा त्याग केला आणि स्वतःला 'क्षत्रियकुलावतंस' म्हणवून घेऊन राज्याभिषेकही करवून घेतला. त्यांनी केलेल्या धर्मक्रांतीतला हा तिसरा सिद्धान्त होय. 'हिंदुभूमीत या कालातही क्षत्रियवंश अखंड आहेत !' सुदैवाने गागाभट्टांसारखे थोर ब्राह्मण धर्मवेत्ते या विचाराला अनुकूल होते. त्यांनी महाराजांना साथ देऊन हे धर्मतत्त्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रकारे साह्य केले. महाभारतकारांच्या शब्दांत म्हणजे हा ब्रह्मक्षत्र योग होय.

(४) समुद्रगमन - आरमार
 'समुद्रगमननिषेध' हे शास्त्रीपंडितांनी प्रचलित केलेले आणखी एक घातकी धर्मतत्त्व होय. 'कलिवर्ज्यप्रकरण' म्हणून एक धर्मग्रंथ दहाव्या अकराव्या शतकाच्या सुमारास लिहिला गेला आणि त्याने कलियुगात 'समुद्रगमन' हे वर्ज्य आहे, असे सांगितले. द्विजस्य अब्धौ तु नौ यातुः शोधितस्य अपि असंग्रहः । नावेतून समुद्रगमन करणाऱ्या द्विजाचा, त्याने प्रायश्चित्त घेतले तरी, परत स्वीकार करू नये, असा निर्बंध त्याने घालून दिला. प्रथम तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तीन द्विजवर्णापुरता होता. पुढे रूढीने तो सर्व वर्गांना लावून टाकला आणि त्यामुळे हा देश सर्व बाजूंनी दरिद्री झाला. दहाव्या शतकाच्या आधी धर्मप्रसारासाठी, साम्राज्यविस्तारासाठी आणि व्यापारासाठी हिंदू लोक सर्व जगभर फिरत होते. आग्नेय आशियातील जावा, सुमात्रा, सयाम, अनाम या देशांत हिंदू साम्राज्ये त्यांनी स्थापन केली होती आणि रामायण- महाभारताच्या संस्कृतीचा प्रसारही केला होता. अरब देश, इजिप्त, ग्रीस, रोम या देशांशी व्यापार करून अगणित संपत्ती ते स्वदेशी आणीत असत. हे सर्व आता थांबले. कारण समुद्रगमन, परदेशगमन हे धर्मशास्त्राने हिंदूंना वर्ज्य केले आणि समाजाने हा दंडक मानला. शिवछत्रपतींनी हा दंडक मानला असता तर त्यांना मराठा आरमार निर्माण करताच आले नसते. पण 'समाजाचा उत्कर्ष ज्याने होईल तो धर्म,' त्यांचा