पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
१४
 

वररुची, हेमचंद्र इ. प्राकृत व्याकरणकार महाराष्ट्री, शौरसेनी, महाराष्ट्री प्राकृताला फार महत्त्व देतात. वररुचीने महाराष्ट्री, शौरसेनी, मागधी व पैशाची या चार प्राकृत भाषांचे व्याकरण लिहिले आहे. त्यात प्रथम महाराष्ट्रीचे व्याकरण ९ अध्यायांत सविस्तर देऊन पुढे एकेका अध्यायात इतर भाषांचे व्याकरण तो देतो. या पुढील अध्यायात त्या भाषांचे काही विशेष नियम देऊन ' शेषं महाराष्ट्रीवत्'- 'बाकीचे नियम महाराष्ट्रीसारखे' असा हवाला तो देतो. हेमचंद्रही 'शेषं प्राकृवत्' असाच निर्वाळा देतो. शौरसेन्यादी भाषांचा उल्लेख त्यांच्या त्यांच्या नावाने करून महाराष्ट्रीला नुसते प्राकृत म्हणण्याची चाल मागल्या काळी होती. प्राकृत हा कधी, चारही भाषा, अशा सामान्य अर्थाने योजीत तर कधी केवळ महाराष्ट्राचा निर्देश त्याने करीत. यावरून त्या भाषेचे महत्त्व किती होते ते कळून येईल.
 पण महाराष्ट्रीचा नुसता असा 'प्राकृत' म्हणून उल्लेख केल्यामुळेच मतभेदाला जागा निर्माण होऊन महाराष्ट्री व महाराष्ट्र यांच्या अविभाज्य संबंधाविषयी व महाराष्ट्रीच्या महत्त्वाविषयी निरनिराळी मते वर मांडण्यात येऊ लागली. श्री. घोष यांच्या मते वररुचीच्या पहिल्या नऊ अध्यायांत महाराष्ट्रीचे व्याकरण नसून शौरसेनीचे आहे. डॉ. घाटगे यांनी या आक्षेपाला आपल्या लेखात सप्रमाण उत्तर दिले आहे व निष्पक्ष दृष्टीने पाहता, 'महाराष्ट्रीचे माहेर महाराष्ट्र होय हे मान्य करावे लागते' असे म्हटले आहे.
 महाराष्ट्री ही महाराष्ट्राचीच या मतावर आणखी एक आक्षेप घेण्यात येतो. तो असा : प्राचीन काळी भारतातील सर्व प्रांतांतील नाटकांत स्त्रियांच्या तोंडी महाराष्ट्री भाषा घालण्याची पद्धत होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्राखेरीज इतर अनेक प्रांतांत महाराष्ट्री रूढ असल्याचे पुरावेही मिळतात. त्यामुळे ती भाषा फक्त महाराष्ट्री होती असे दिसत नाही. पण या आक्षेपात अर्थ नाही. सातवाहनाचे साम्राज्य एकदोन शतके भारतातील अनेक प्रांतांवर होते. त्यांची भाषा महाराष्ट्री होती. हे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे. तेव्हा मराठ्यांच्या साम्राज्यकाळी ज्याप्रमाणे मराठी भाषा तंजावर, बंगलोर, ग्वाल्हेर, उज्जयनी, इंदोर इ. प्रांतांत पसरली त्याचप्रमाणे सातवाहनाच्या साम्राज्यकाळी त्यांची महाराष्ट्री साम्राज्यातील देशात पसरली असणे पूर्ण शक्य आहे. शिवाय महाराष्ट्री भाषा सौंदर्य, सौकुमार्य, मधुरता या गुणांमुळे सर्वत्र विख्यात झाली होती. व्याकरणकारांनी, कवींनी तिचे महत्त्व गायिले होते. त्यामुळे ती स्त्रियांच्या तोंडी घालावी असे नाटककारांना वाटणे साहजिक आहे. सर्व द्रविड देशांत १८५६ पर्यंत तालुक्याचे दफ्तर मराठीत असे. सर्व वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना मराठी लेखनवाचन येणे तोपर्यंत अवश्य होते. हा विचार या संदर्भात ध्यानात ठेवावा ( प्रा. श्रीनिवासाचारी, अन्नमलाई विद्यापीठ, डॉ. देवदत्त भांडारकर कमे. व्हॉल्यूम पृ. ४० ).
 महाराष्ट्री भाषा सर्व भारतभर प्रसृत होण्याचे आणखी एक कारण आहे. इ. पू.