पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३९२
 

त्यांतील कलियुग या शेवटच्या युगात धर्म लयास जाणार, मानवाची प्रज्ञा, बुद्धिमत्ता, कर्तृत्व यांचा पूर्ण ऱ्हास होणार, असा सिद्धान्त या भूमीत रूढ झालेला आहे. या तऱ्हेची कलियुगकल्पना, हे कलियुगाचे तत्त्वज्ञान, प्रामुख्याने पुराणांनी प्रतिपादिलेले आहे. वायू, गरुड, लिंग इ. पुराणांत कलियुगाची, म्हणजे त्या युगात होणाऱ्या अधःपाताची भयानक वर्णने आहेत. वेदांत किंवा उपनिषदांत कलियुगतत्त्व नाही. स्मृतींतही नाही. महाभारताला कलियुग मान्य नाही. मानव हा कालवश नसून आत्मवश आहे, असाच व्यासमुनींचा सिद्धांत आहे. 'राजा आपल्या पराक्रमाने कृतयुग निर्माण करू शकतो, काल हा राजाचे कारण नसून राजा हाच कालकारण आहे. राजा एव युगमुच्यते ।' अशी वचने महाभारतात आढळतात. धर्म आणि राज्य यांचा विवेक करून, 'राजाच युग निर्माण करतो' असे शुक्रनीतीही म्हणते. पण हळूहळू पुराणांचा पगडा हिंदू मनावर बसू लागला, त्यांतील कलियुग कल्पनेचे विष समाजाच्या अंगात भिनू लागले आणि दहाव्या अकराव्या शतकाच्या सुमारास त्याची जीवशक्ती अगदी क्षीण होऊन गेली. यापुढे हिंदू राजा होणारच नाही, राजा मुसलमानच असणार, असाच सिद्धांत हिंदू मानसात रुतून बसला आणि हा समाज हतवीर्य झाला. प्राचीन काळी ऋषिमुनी पुण्यशील होते. देवाची या भूमीवर कृपा होती. पण तो काळ निराळा. आता कलियुग आले. आता ऋषिमुनी येथून निघून जाणार आणि देवही हिंदूंना प्रतिकूलच होणार, अशी अत्यंत घातकी श्रद्धा पुराणकारांनी, शास्त्रीपंडितांनी, भटभिक्षुकांनी, बुबागोसाव्यांनी रुजवून टाकली. महाराष्ट्रातून हिंदू राज्ये नष्ट झाली, याविषयी महिकावतीची बखर लिहिणारा लेखक म्हणतो, 'कलियुगात असा प्रकार होणार अशी भाक (वचन) लक्ष्मीनारायणाने कलीस दिली होती. ती शके १२७० (इ. स. १२४८)त खरी ठरली. हरिहर गुप्त झाले, ऋषि बद्रिकाश्रमी गेले, वसिष्ठही गेले, सूर्यवंशी, चंद्रवंशी क्षत्रिय यांची शस्त्रविद्या लुप्त झाली.'
 विश्वाचे त्राते जे देव आणि ऋषिमुनी त्यांनीच आपल्याला कलीच्या स्वाधीन केले आहे, अशी श्रद्धा जो समाज जोपासतो त्याच्या हातून पराक्रम कसा होणार ? मुस्लिमांचे राज्य व्हावे, असे देवाच्या मनात असले, तर आपल्याला स्थापण्यात यश कसे येणार, अशी विपरीत बुद्धी ज्या लोकांची झाली त्यांच्या हातून परकीय आक्रमणाचा प्रतिकार कसा होणार ?

श्रींची इच्छा
 कलियुगाचा हा फास हिंदूंच्या मानेभोवती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांच्या हातून स्वराज्याचा उद्योग होणार नाही हे शिवछत्रपतींनी जाणले आणि तो तोडण्यासाठी त्यांनी जाहीर घोषणा केली, 'हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे'. दादाजी नरस प्रभू यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, 'श्री रोहिरेश्वर याणी आम्हांस यश