पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३९३
मराठा काल
 

दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ, हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे. '
 परमेश्वरच आपल्याला प्रतिकूल आहे, आपल्याविरुद्ध आहे हे कलियुगाचे तत्त्वज्ञान होते. त्याचा उच्छेद शिवछत्रपतींनी केला. 'हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींचीच इच्छा आहे' असा या रीतीने आत्मविश्वास त्यांनी मराठ्यांच्या ठायी निर्माण केला आणि त्यामुळेच मुस्लिम सत्तेचे निर्दालन करून मराठी साम्राज्य भारतात स्थापण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले. जावळीचे मोरे दिमाखाने म्हणत, 'आम्हांस पादशहाने, राजे किताब, मेहरबान होऊन दिधले.' महाराजांनी त्यांना बजावले की 'आम्हांस श्री शंभूने राज्य दिले आहे.'
 परमेश्वरच हिंदुराजांना प्रतिकूल आहे. त्यानेच कलीला, त्यांच्या शत्रूंना, आशीर्वाद दिला आहे, या दुष्ट कल्पनेचे महाराजांना निर्मूलन करावयाचे होते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी, तसे काही नसून तो आपल्या पाठीशी सतत उभा आहे, असे ते सांगत असत. व्यंकोजीला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, 'तुम्ही असा विचार करावा होता की श्री देवाची व श्रीची कृपा त्यावरी (आम्हांवरी) पूर्ण झाली आहे. दुष्ट तुर्काला ते मारतात. तेव्हा आपल्या (व्यंकोजीच्या) सैन्यातही तुरुक लोकच असता जय कैसा होतो आणि तुरुक लोक कैसे वाचो पाहातात ?'
 व्यंकोजीच्या ठायी शहाजी राजांच्या सारखाच काहीसा पराक्रम होता. पण विजापूरच्या पादशहाच्या कृपेने आपण राज्य मिळविले अशी त्याची श्रद्धा होती, स्वराज्याची उभारी त्याच्या मनाला पेलेचना. म्हणून 'स्वराज्यसाधनेला श्रीच अनुकूल आहेत. दुष्ट तुरुकांचा, देवच आमच्या हातून नाश करवीत आहेत' असा विचार छत्रपतींनी त्याला या पत्रात मुद्दाम सांगितला. पण दुर्दैवाने त्याचे मेलेले मन जिवंत झाले नाही.

पुरुष - प्रयत्न
 कलियुगाचे तत्त्वज्ञान हे अपरिहार्यपणेच दैववादी आहे. मानव हा कालवश आहे हाच तर त्याचा मुख्य सिद्धांत. तेव्हा प्रयत्नवादाला काही अर्थच राहात नाही आणि प्रयत्नवादावाचून कोणत्याही समाजाचा अभ्युदय होणे शक्य नाही. 'यत्न तो देव जाणावा', असे समर्थांनी सांगितले ते याच अर्थाने, आणि शिवछत्रपती तर मूर्तिमंत प्रयत्नवाद. हिंदवी स्वराज्याला श्री अनुकूल आहेत हे खरे असले तरी, 'न ऋते श्रांतस्य सख्याय देवाः'–कष्ट केल्यावाचून देव कोणावर प्रसन्न होत नाहीत- हे वेदवचन त्यांनी चांगले जाणले होते. त्यामुळेच कलियुग कल्पनेवरोवरोच दैववादाचाही त्यांनी निषेध केला. मल्हारराव रामराव चिटणीस यांनी आपल्या सप्तप्रकरणात्मक चरित्रात महाराजांचे हे विचार चांगले व्यक्त केले आहेत. महाराजांनी विचार केला, 'आपण हिंदू, सर्व दक्षण देश म्लेंच्छांनी ग्रासिला, धर्म बुडविला. हा रक्षणार्थ प्राणही वेचून धर्म रक्षू व आपले पराक्रमाने नवीन दौलत संपादू. नवे साधावे हे या कुलात जन्म-