पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३९१
मराठा काल
 

येईल, ही त्याला मोठी आशा होती. पुढे आठ वर्षांनी मोगलांची स्वारी गोवळकोंड्यावर झाली. त्या वेळी मोगलांच्या प्रोत्साहनाने, मादण्णाचा स्थानिक मुस्लिमांनी खून केला. त्याविषयी लिहिताना इंग्रज फ्रेंचादी परकी टीकाकार म्हणतात की 'त्याने गोवळकोंड्याच्या राज्यात सर्वत्र आपल्या जातीचाच कारभार सुरू केला होता.' त्र्यं.शं. शेजवलकरांच्या मते मादण्णाला हिंदुराज्यस्थापनेची ही प्रेरणा शिवछत्रपतींच्याकडूनच मिळाली होती (संकलित शिवचरित्राची प्रस्तावना, पृ. १७४, १७५).

पादशाही हिंदूंची
 औरंगजेबाला छत्रपतींनी जिझिया कराच्या निषेधार्थ पाठविलेल्या पत्राचा उल्लेख वर आलाच आहे. आग्र्याहून महाराज सुटून आले म्हणून तो आधीच पिसाळला होता. त्यानंतर पुढच्या दहाबारा वर्षात छत्रपतींची सारखी चढती कमानच होती. आणि आता दक्षिणेतही हिंदवी स्वराज्याचे लोण त्यांनी पोचविले होते. उत्तरेत शिखांनी चालवलेल्या प्रतिकारालाही कडवी धार येत होती. त्यामुळे भडकून जाऊन हिंदूंवर जिझिया कर लावून, देवळे पाडणे, मूर्ती फोडणे, हिंदूंच्या कत्तली करणे हा धर्मच्छळ त्याने नव्या जोमाने फिरून सुरू केला आणि स्वराज्यावाचून हिंदुधर्माचे रक्षण होणार नाही, हे पुन्हा एकदा हिंदूंना दाखवून दिले. आजपर्यंत मुस्लिम पादशहांनी हे अनेक वेळा दाखवून दिलेच होते. पण सर्व हिंदू राजे, सरदार हे मूढ व स्वत्वशून्य झालेले असल्यामुळे त्यांना कोणी उत्तर दिले नव्हते. पण आता परिस्थिस्ती पालटली होती. शिवछत्रपतींचा उदय झाला होता. त्यांनी औरंगजेबाला खरमरीत पत्र लिहून 'पादशाही पुरातन हिंदूंची आहे, तुमची नाही' असे बजावले आणि या वाक्यामागे हिंदूचे खड्ग उभे केले.
 आरंभापासून अखेरपर्यंत, हिंदूंची ती पुरातन पादशाही, ती हिंदूंची साम्राज्यसत्ता पुन्हा प्रस्थापित करणे आणि हिंदुधर्म, हिंदुसंस्कृती यांचे रक्षण करणे हाच महाराजांचा जीवनहेतू होता, हे यावरून स्पष्ट होईल. त्यातच त्यांची स्वधर्मसाधना होती, त्यातच त्यांचा मोक्ष होता.

(२) राजा - कालकारण
 प्राचीन काळी स्वराज्याची, आसमुद्र साम्राज्याची अशी महती ऋषींनी तत्ववेत्त्यांनी गायिलेली असताना, सर्व धर्म राजधर्मप्रधान आहेत, असे सांगितलेले असताना, हिंदू राजांना, शास्त्रीपंडितांना स्वराज्याचा एवढा विसर पडावा याचे कारण काय, असा प्रश्न मनात येतो. कलियुगाचे तत्त्वज्ञान हे त्याचे कारण आहे.

कलियुग
 कृत, त्रेता, द्वापार आणि कली अशी चार युगे आपल्याकडे मानलेली आहेत.