पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३९०
 

छोटेसे स्वतंत्र राज्य होते. छत्रसालाचा पिता चंपतराय याने शहाजहानाशी लहून महोबाचे स्वातंत्र्य टिकविले होते. पुढे शहाजहानविरुद्ध औरंगजेब उठला, तेव्हा चंपतरायाचे साह्य त्याने मागितले व 'तुझे स्वातंत्र्य मी अबाधित राखीन,' असे त्या वेळी त्याने त्याला आश्वासनही दिले. पण सत्ता हाती आल्यावर त्याने महोबावर स्वारी केली. त्या वेळी चंपतराय रणांगणावर पडला. त्याचाच मुलगा छत्रसाल. तो औरंगजेबाचा नाइलाजाने मांडलिक झाला होता. पण त्याची स्वातंत्र्यलालसा मनात तशीच धगधगत होती. जयसिंहाने दक्षिणेवर स्वारी केली, तेव्हा दिलेरखानाच्या हाताखाली छत्रसाल आपले सैन्य घेऊन दाखल झाला होता. पुढील पाचसहा वर्षांत त्याने शिवाजी महाराजांचा पराक्रम डोळ्यांनी पाहिला आणि त्याची स्वातंत्र्यवृत्ती पुन्हा उफाळून आली. तेव्हा १६७१ साली गुप्तपणे तो महाराजांना येऊन भेटला आणि मला आपल्या सेवेत रुजू करून घ्या, अशी विनवणी त्याने केली. महाराजांना यामुळे फार आनंद झाला. पण त्यांनी छत्रसालला सांगितले की 'तू येथे माझ्या हाताखाली काम करण्यापेक्षा बुंदेलखंडात स्वतंत्रपणे उठाव कर. असा अनेक दिशांनी उठाव झाला तरच औरंगजेबाची सत्ता उलथून पडेल.' छत्रसालाला ते मानवले आणि बुंदेलखंडात परत जाऊन त्याने स्वतंत्रपणे हिंदुध्वज उभारला व बुंदेलखंडात स्वराज्याची स्थापना केली.

राजसिंह
 औरंगजेबाने १६७६ साली हिंदूंवर जिझियाकर लादला, तेव्हा त्याच्या निषेधार्थ महाराजांनी त्याला जे पत्र लिहिले त्यात त्यांनी म्हटले आहे की 'गरीब, अनाथ लोकांना छळण्यात काय पुरुषार्थ आहे ? हिंदू लोकास पीडा करण्यातच धर्म आहे, असे मनामध्ये आले असल्यास, आधी राजा राजसिंह (मेवाडचा राणा, याने स्वराज्यासाठीच उठाव केला होता) याजपासून जिझिया घ्यावा.' महाराजांची दृष्टी भारतभर कशी चौफेर फिरत होती आणि हिंदवी स्वराज्याची त्यांची कल्पना किती व्यापक होती ते यावरून ध्यानात येईल.

मादण्णा
 शिवछत्रपतींनी दक्षिणेवर स्वारी केली, त्यात व्यंकोजीला स्वातंत्र्याची प्रेरणा द्यावी हा तर हेतू होताच, पण आणखीही एक जास्त व्यापक हेतू होता. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाचा दिवाण मादण्णा हा हिंदुत्वाचा अभिमानी होता. आणि जुन्या हिंदवी तेलगू सिंहासनाचे पुनरुज्जीवन करावे, असा त्याचा प्रयत्न होता. शिवछत्रपती तेथे येण्यापूर्वीच त्याने स्थानिक ब्राह्मणांचे वर्चस्व वाढवून आणि मुसलमानी सरदारांची कुरघोडी थांबवून या गोष्टीचा पाया घातलाच होता. छत्रपती गोवळकोंड्यास आल्यावर मराठा सैन्याकडून तो मुलूख जिंकला जाईल आणि तेथे पुन्हा हिंदू राज्य प्रस्थापिता