पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८९
मराठा काल
 

ठायी दक्ष राहून तुरूक लोकांचे साधन (साह्य) न करावे, तुरुकांना, मुस्लिमांना साह्य करणे हे पाप आहे. हा अधर्म आहे, हे तत्त्व महाराजांच्या मनात किती निश्चित होते, ते यावरून कळून येते.

जयसिंहास आवाहन
 जयसिंह मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्यासाटी चालून आला होता, त्या वेळी त्याला छत्रपतींनी जे पत्र लिहिले त्यावरून त्यांचे ध्येय, त्यांच्या मनातील क्रांतितत्त्व, त्यासाठी अनुसरावयाचा मार्ग याचे पूर्ण चित्र आपल्या डोळ्यांपुढे उभे राहते. ते म्हणतात, 'जयसिंहा, तू आपणहून दक्षिण देश जिंकण्यासाठी आला असतास तर मोठी सेना घेऊन मी तुझ्या पाठीशी आलो असतो आणि सर्व भूमी तुला जिंकून दिली असती. पण तू औरंगजेबाचा सरदार म्हणून आला आहेस... हाच क्रम पुढे आणखी काही दिवस चालत राहील तर आम्हां हिंदू लोकांचे चिन्ह देखील पृथ्वीवर राहणार नाही. आम्ही लोकांनी या वेळी हिंदू, हिंदुस्थान व हिंदुधर्म यांच्या संरक्षणासाठी फार जोराचे प्रयत्न केले पाहिजेत. जर तू मारवाडचा राजा जसवंतसिंह व मेवाडचा राजा राजसिंह यांच्याशी ऐक्य करशील तर फार मोठे काम होईल. तुम्ही उत्तरेतून उठावणी केली तर मी विजापूर व गोवळकोंडा या दोन्ही बादशहांना जिंकीन आणि सर्व दक्षिण देशच्या पटावरून इस्लामचे नाव किंवा चिन्ह धुऊन टाकीन.' (सारार्थ).
 जयसिंहाला लिहिलेल्या पत्राचाही काही उपयोग झाला नाही हे उघडच आहे. हिंदुधर्माच्या रक्षणासाठी मुस्लिमांशी लढा केला पाहिजे, ही कल्पना त्याला कधी शिवलीही नाही.
 आणि शिवछत्रपतींच्या धर्मतत्त्वातील हा तर पहिला सिद्धान्त होता. मुस्लिम आक्रमकांचा उच्छेद करून हिंदुराज्य प्रस्थापित केल्यावाचून हिंदुधर्माचे रक्षण होणार नाही. स्वराज्य आणि स्वधर्म यांचा असा अविभाज्य संबंध असल्यामुळे त्यांनी स्वतः स्वराज्यस्थापनेचे प्रयत्न तर आरंभिले होतेच. पण मुस्लिमांविरुद्ध अखिल भारतात सर्व प्रदेशात उठाव व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे मुस्लिमांच्या अधिसत्तेखाली राहून त्यांची सेवा करणाऱ्या सर्व हिंदू सरदारांना ते तशी प्रेरणा देत होते. व्यंकोजी, लखम सावंत व जयसिंह यांना त्यांनी लिहिलेली पत्रे तेच दर्शवितात. त्यांचा काही उपयोग झाला नाही हे खरे. पण 'हिंदवी स्वराज्य' या ध्येयासाठी महाराज केवढा प्रयत्न करीत होते ते त्यावरून दिसून येईल.

छत्रसाल
 वरील सरदारांच्या बाबतीत त्यांना यश आले नाही. पण बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल याला दिलेली प्रेरणा बरीच यशस्वी झाली. बुंदेलखंडातील महोबा हे एक