पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३८८
 

पड्यांचा अपराध काय होता ? जिजामाता म्हणतात, 'त्यांनी स्वधर्मसाधनता सोडून यवन दुष्ट तुरुक यांचे कृत्यास ते अनुकूल झाले !' १६७८ साली समर्थांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती लिहितात, 'आपण मला आज्ञा केली की तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करून धर्मस्थापना करणे ! हे व्रत संपादून त्यात परमार्थ करावा.' अर्थ स्पष्ट आहे. धर्मरक्षणासाठी राज्यसाधना केली पाहिजे. राजाचा तोच परमार्थ, तोच मोक्ष, अशी समर्थांची आज्ञा होती.

व्यंकोजीस उपदेश
 छत्रपतींचे धाकटे भाऊ व्यंकोजी यांच्याशी त्यांचा जो पत्रव्यवहार झाला त्यावरूनही, धर्मरक्षणासाठी सर्वत्र स्वराज्याची स्थापना झाली पाहिजे, हा महाराजांचा सिद्धान्त स्पष्ट उमगून येतो. कर्नाटकच्या स्वारीवर जाण्यापूर्वी १६-६ साली त्यांनी व्यंकोजीला एक पत्र लिहिले होते. त्या आधी व्यंकोजीने तंजावरचे राज्य विजापूरकरांतर्फे जिंकून तेथे राजधानी केली होती. पण तंजावरास आधी राज्य होते ते विजयराघव या हिंदुराजाचे होते. मदुरेचा चोक्कनाथ नायक याचा व्यंकोजीने पराभव केला. हा राजाही हिंदूच होता आणि ही दोन्ही राज्ये व्यंकोजीने आदिलशाहीसाठी जिंकली होती. शिवछत्रपतींना यामुळे फार उद्वेग वाटला. म्हणून त्यांनी व्यंकोजीला पत्र लिहून उपदेश केला की चंदीला खवासखानाचा भाऊ नासिरखान आहे, त्याला मारून ते राज्य घ्यावे. विजापूरचा पठाण वजीर सरदार बहलोलखान याचा सेनापती शेरखान याचा पराभव करून बहलोलखानाचा तिकडचा मुलूख जिंकावा. त्याचप्रमाणे वेलोरचा किल्लाही जिंकावा. आणि असे करताना विजयनगरचे वारस असे तिकडचे नायक हिंदुराजे यांशी सख्य करावे.
 पण स्वराज्य हे ध्येयच व्यंकोजीच्या मनापुढे नसल्यामुळे त्याने यातले काहीच केले नाही. आणि पुढे महाराज दक्षिणेत गेल्यावर त्यांच्याशीच त्याने लढाई केली. तेव्हा महाराजांना त्याचा पाडाव करणे भाग पडले. त्यानंतर जो तह झाला त्यातही 'हिंदुद्वेषी यांस आपले राज्यात ठेवू नये, विजापूरकरांचा व आमचा तह ठरला त्यात विजापूरकरांची चाकरी एकोजी करणार नाही, प्रसंग पडेल तेव्हा इमाने इतबारे मदत करू, इतकेच ठरले आहे. तरी चाकरी करणे, असे समजू नये' असे कलम त्यांनी घातले. कर्नाटकातही स्वतंत्र हिंदुसत्ता स्थापन झाली पाहिजे हे त्यांचे उद्दिष्ट यावरून स्पष्ट होते.

लखम सावंत
 १६५८ साली कुडाळचा लखम सावंत याच्यावर विजापूरचा सरदार रुस्तुमजम चालून आला होता. त्या वेळी सावंताला साह्य करून शिवछत्रपतींनी त्याला वाचविले. त्या वेळी त्याच्याशी जो तह झाला त्यातले एक कलम असे आहे, 'स्वराज्यसाधनाच्या