पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८७
मराठा काल
 


(१) शस्त्रेण रक्षिते राज्ये
 या क्षेत्रातला त्यांचा पहिला क्रांतिकारक सिद्धान्त म्हणजे स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद आहे हा होय. या सिद्धान्ताला क्रांतिकारक असे म्हणण्याचे वास्तविक काही कारण नाही. भारतातील प्राचीन तत्त्ववेत्त्यांनी शतवार हा सिद्धान्त वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण या ग्रंथांत सांगितलेला आहे. राजधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म होय, असा त्यांचा सिद्धान्त होता, हे मागे सांगितलेच आहे. महाभारतात आणखी त्या अर्थाची कितीतरी वचने आहेत. धर्मे तिष्ठन्ति भूतानि धर्मो राजनिष्ठति ॥ राष्ट्रस्य एतत् कृत्यतमं राज्ञ एवाभिषेजनम् ॥ राजाला अभिषेक करणे म्हणजेच राजसंस्था टिकवून धरणे हे राष्ट्राचे, लोकांचे, सर्वात महत्त्वाचे कार्य होय. सर्वे धर्माः राजधर्म प्रधानाः । सर्वो हि लोको नृपधर्भमूलः ॥ या वचनांचा तोच भावार्थ आहे. शिवाय, 'शस्त्रेण रक्षिते राज्ये, शास्त्रचिंता प्रवर्तते ।' हे व्यासवचन अगदी निर्णायक आहे. शस्त्रबलाने राज्याचे रक्षण केले तरच तेथे शास्त्रे, विद्या, संस्कृती यांचा उदय व संरक्षण होते. 'सर्वा विद्या राजधर्मेषु युक्ताः । सर्वे लोका राजधर्मप्रविष्टाः ।' या वचनाचा तोच अर्थ आहे. दुर्दैवाने या ऋषिवचनांचा भारतातील राजपुरुषांना विसर पडला होता. पृथ्वीराजानंतरचे रजपूत सरदार, बहामनी काळातले मराठे सरदार, विजयनगरनंतरचे दक्षिणेतले राजपुरुष या सर्वांना हिंदू धर्माचा अभिमान नव्हता असे नाही. पण स्वराज्य स्थापून त्या धर्माचे रक्षण करणे हे अभिमानाचे पहिले लक्षण आहे, असे त्यांना कधीच वाटले नाही. तीर्थयात्रा, व्रते वैकल्ये, मंदिरे बांधणे, त्यांना जमिनी लावून देणे, साधुसंतांकडून उपदेश घेणे यातच त्यांचा हिंदुधर्म होता आणि हे आचार एकदा पाळले म्हणजे मुस्लिमांच्या साम्राज्याचा विकास करणे, त्यासाठी हिंदू सत्ता नष्ट करणे, देवळे पाडणाऱ्या, मूर्तिभंजन करणाऱ्या, हिंदू स्त्रियांची विटंबना करणाऱ्या आणि हिंदू संस्कृती नष्टांश करून टाकण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या बादशहांची सेवा करणे, यात आपण हिंदुधर्माशी द्रोह करतो आहो, असे त्यांच्या स्वप्नातही कधी येत नसे. स्वराज्य व स्वधर्म यांचे अद्वैत आहे, हे धर्माचे पहिले तत्त्व त्यांच्या गावीही नसल्यामुळेच भारतात मुस्लिमांच्या राज्यांचा, साम्राज्यांचा व एकंदर मुस्लिम सत्तेचा विकास होऊ शकला.

मातुःश्रींची आज्ञा
 शिवछत्रपती हा सर्व प्रकार डोळ्यांनी पहात होते. पूर्वीच्या कथांवरून त्यांनी हेच जाणले होते; म्हणून स्वराज्याची स्थापना हे आपले धार्मिक कर्तव्य असा निश्चय त्यांनी केला. मातुःश्री जिजाबाई आणि समर्थ रामदासस्वामी यांनी आपल्याला हीच आज्ञा केली असे त्यांनी त्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे. इ. स. १६६४ साली बाजी घोरपडे यास त्यांनी ठार मारले. तशी मातुःश्रींची आज्ञाच होती. घोर-