पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८५
मराठा काल
 

पिसाट होते आणि धर्मप्रसारासाठी वाटेल ते क्रौर्य करण्यास, कत्तली, विध्वंस, संहार, अमानुष छळ करण्यास ते मागेपुढे पहात नसत. हिंदूंचा सर्वनाश हेच मुस्लिमांप्रमाणेच त्यांचेही ध्येय होते. शिवाय ते स्वतःच पाश्चात्य देशातून आल्यामुळे नौकानयन, दुर्गांची उभारणी, नवी शस्त्रास्त्रे या दृष्टीने ते मुसलमानांपेक्षाही वरचढ होते. युरोपात त्या वेळी प्रबोधन युग सुरू झाले होते. त्यातून सर्वत्र पसरलेली भौतिक विद्या पोर्तुगीजांना अवगत होती. व्यापार हा तर भारतात येणाऱ्या पाश्चात्य सत्तांचा आत्माच होता. पोर्तुगीज या वेळी तर व्यापारात आघाडीवर होते. अरबांचा व्यापार पाहता पाहता त्यांनी हस्तगत केला आणि कोकण भागात अनेक बंदरे आणि किल्ले बांधून आपली राजसत्ता, धर्मसत्ता व आर्थिक सत्ता यांचा पाया त्यांनी भक्कम करून टाकला.

इंग्रज - अलिप्तता
 इंग्रज हा हिंदूंचा आणि मराठ्यांचा तिसरा शत्रू. इंग्रज हे मुस्लिम किंवा पोर्तुगीज यांच्या इतके कडवे आणि मूलगामी वैरी नव्हते. पण जास्त धोरणी, जास्त राजनीति- निपुण, पाश्चात्य विद्येने जास्त संपन्न आणि म्हणूनच जास्त भयंकर असा हा शत्रू होता. प्रारंभी मराठी सत्तेशी त्यांनी उघड वैर केले नाही. पण हिंदुस्थानात मुस्लिम सत्ताच कायम राहावी, मराठी सत्तेचे निर्मूलन व्हावे, अशी त्यांची इच्छा व तसेच प्रयत्नही कायम चालू असत. आपण केवळ व्यापारी आहो, राजकारणापासून अलिप्त आहो, असे बाह्यतः ते सांगत आणि मराठ्यांना कधीही साह्य करीत नसत. पण त्यांचा शत्रू जो विजापूर किंवा मोगल याला मात्र ते अंतःस्थपणे विपुल साह्य करीत असत. इंग्रजांप्रमाणेच फ्रेंच आणि डच हेही मराठ्यांचे शत्रूच होते. पण ते फारसे प्रवळ कधीच झाले नाहीत. मराठ्यांशी त्यांचा सामना असा कधी झाला नाही. मात्र हिंदुस्थानात मुस्लिमांचे राज्यच असावे, मराठ्यांचा कधीही जय होऊ नये, ही त्यांचीही इंग्रजांप्रमाणेच वासना होती. शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेतून सुटत नाहीत, असे वृत्त जेव्हा सगळीकडे पसरले होते, तेव्हा 'शिवाजीपासून आता आपली मुक्तता झाली' असा आनंद मनोमन हे सर्व पाश्चात्य व्यापारी मानीत होते.

हाडवैरी
 शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला त्या वेळी सर्व हिंदुस्थान हिंदूच्या हाडवैऱ्यांनी असा ग्रासलेला होता. हे सर्व शत्रू हिंदूंना नामशेषही राहू देण्यास तयार नव्हते. मुरुस्लिमांनी इराण, अफगणिस्तान, बलुचिस्तान या देशांत तद्देशीयांच्या बाबतीत हे केलेच होते. पोर्तुगीज जेथे जेथे गेले तेथे तेथे- आफ्रिकेत, लॅटिन अमेरिकेत, गोव्यात- त्यांनी हेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवले होते. गेल्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत सर्व हिंदुस्थान लवकरच ख्रिश्चन होऊन जाईल, अशी इंग्रज पंडितांनाही आशा होती.
 २५