पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३८४
 

ज्याची शपथ घेतली त्या वेळी हिंदुस्थान हा देश चहू बाजूंनी शत्रूंनी ग्रासलेला होता. मुस्लिम हे या देशाचे पहिले शत्रू. साडेसहाशे वर्षे ते या देशावर आक्रमण करीत होते. आणि १५६५ साली विजयनगरचा पाडाव झाल्यानंतर त्या सत्तेचा प्रतिकार करील अशी एकही शक्ती भारतात राहिलेली नव्हती. मुस्लिमांनी केवळ हिंदूंची राजसत्ताच नष्ट केली होती, असे नव्हे; तर हिंदुधर्म, हिंदुसंस्कृती, हिंदुपरंपरा आणि समस्त हिंदुजीवनच त्यांनी उध्वस्त करीत आणले होते. हिंदू आणि मुस्लिम यांचे वैर अगदी मूलगामी होते. हिंदुस्थान हा देश निर्हिंदु करून टाकण्याची मुस्लिमांची प्रतिज्ञा होती आणि अफगाणिस्थान, सिंधप्रांत, बंगाल, पंजाब या देशांत त्यांनी ती बरीचशी सिद्धीस नेली होती. सहजीवन ही कल्पना इस्लामला सर्वथा नामंजूर होती. इस्लामेतर समाज, इस्लामेतर धर्म, संस्कृती याचा संपूर्ण नाश करून सर्व जग इस्लामच्या कक्षेत आणून सोडणे हाच खरा इस्लामचा विजय, अशी मुसलमानांची धारणा होती.
 अशा आकांक्षेने प्रेरित झालेला हा मुस्लिमसमाज तुलनेने पाहता त्या काळच्या हिंदुसमाजापेक्षा पुष्कळच बलशाली होता. मुस्लिम तेवढा एक ही निष्ठा त्यांच्यात तुलनेने खूपच जास्त प्रमाणात होती. त्यामुळे हा समाज लवकर संघटित होत असे. शिवाय व्यापार, धर्मप्रसार व साम्राज्य यासाठी मुस्लिम लोक सर्व जगभर फिरत असल्यामुळे त्यांचा आलोक हिंदूंच्यापेक्षा जास्त व्यापक होता. अरबस्तान, इराक, तुर्कस्थान, इराण, अफगणिस्थान, मध्य आशिया अशा लांबलांबच्या प्रदेशातून हजारो मुस्लिम हिंदुस्थानात दरसाल येत आणि देशभर राज्य करीत असलेल्या मुस्लिम सत्तांमध्ये वरिष्ठ, मानाची स्थाने मिळवून त्या त्या सत्तांचे बळ वाढवीत. मुस्लिमांचे दळणवळण युरोपशी नित्य चालू असल्यामुळे दारूगोळा, तोफा, बंदुका ही नवी शस्त्रास्त्रे त्यांच्या परिचयाची होती आणि ती त्यांनी हिंदुस्थानात आणल्यामुळे त्यांच्या लष्करी सामर्थ्यात सतत वाढ होत असे. अशा बहुविध बलांचा हिंदूंजवळ संपूर्ण अभाव होता. त्यामुळे आक्रमकांचा प्रतिकार करण्याची त्यांची शक्ती लुळीपांगळी होऊन गेली होती.

मूलगामी वैरे
 पोर्तुगीज हा हिंदूंचा दुसरा शत्रू मुसलमानांच्या तुलनेने पोर्तुगीज हा शत्रू लहान होता. त्याचे सामर्थ्य कमी होते. पण हिंदूंचे, निदान महाराष्ट्रीयांचे जीवन उध्वस्त करून टाकण्याच्या दृष्टीने त्यांच्या ठायी पुरेसे सामर्थ्य होते. १४९८ साली त्यांनी या देशात प्रवेश केला. १५१० साली गोवा घेतला आणि दहावीस वर्षात आपला पाय महाराष्ट्राच्या या नंदनवनात पक्का रोवला. पोर्तुगीज हे मुस्लिमांप्रमाणेच हिंदूंशी मूलगामी वैर करणारे लोक होते. केवळ राजकीय सत्तेवर त्यांची तहान भागत नव्हती. आपले राज्य निर्हिंदू करून टाकणे हे त्यांचे ध्येय होते. मुसलमानांप्रमाणेच ते धर्म-