पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३
महाराष्ट्राची पृथगात्मता
 

तर संस्कृतच्या पूर्वरूपापासून सूक्तांच्या ऋग्-मंत्रांच्या काळीही प्राकृत भाषा होतीच. प्राकृत हा शब्द त्यांच्या मते मूळचा नव्हे. मूळ शब्द पाअड-म्हणजे सोपे. अवघड ते संस्कृत व मूळचे सोपे ते प्राकृत. पाअडचे 'प्राकृत' हे संस्कृतीकरण होय.
 भागवत म्हणतात की, "प्राकृत भाषांची नावे त्या त्या लोकांवरून किंवा त्यांनी बनविलेल्या देशांवरून पडलेली आहेत, यात शंका नको. या दृष्टीने पाहता शालिवाहन, पैठण व महाराष्ट्र यांचा आज २२०० वर्षे अविभाज्य संबंध आहे व 'महाराष्ट्र' या शब्दाचा या भूमीवर आज २२०० वर्षे खडा पहारा आहे. " ( प्राकृत भाषेची विचिकित्सा, आवृत्ती २ री, १९३०- पृ. ५३,५५ )

महाराष्ट्री - अपभ्रंश
 डॉ. पां. दा. गुणे यांनी ' कुलगुरू चिं. वि. वैद्य व मराठी भाषेची उत्पत्ती' या आपल्या लेखमालेत 'महाराष्ट्री प्राकृत' भाषेविषयी थोड्याफार फरकाने असाच अभिप्राय दिला आहे ( वि. ज्ञा. विस्तार, जुलै १९२२, वर्ष ५३ ). ते म्हणतात, ज्या ज्या वेळी व जेथे जेथे नव्या भाषा उत्पन्न झाल्या त्या त्या वेळी तेथे तेथे दोन अगदी भिन्न संस्कृतींच्या, भिन्न भाषांच्या व भिन्न मानववंशांच्या लोकांची टक्कर होऊन त्यांपकी कोणत्याही कारणाने, हीन असतील ते प्रबळांशी मिसळून गेलेले असतात. असे होते तेव्हाच भिन्न भाषा उत्पन्न होतात. अशाच मार्गाने निरनिराळ्या प्राकृत भाषा इ. पू. १०४० पासून इ. पू. ८०२ पर्यंत उत्पन्न होत गेल्या. त्या काळी आर्य लोक बाहेरून आले व त्यांनी हीन संस्कृतीच्या जित लोकांवर आपली संस्कृती व भाषा लादली. मूळचे लोक भिन्न मानवजातीचे व बहुतेक -हीन संस्कृतीचे असल्या- मुळे त्यांच्या तोंडी संस्कृताचे मूळरूप विकृत झाले व निरनिराळ्या प्रांतांत निरनिराळ्या प्राकृत भाषा जन्मास आल्या. डॉ. गुणे यांच्या मते हाच प्रकार पुन्हा होऊन इ. स. च्या प्रारंभापासून इ. स. ३०० पर्यंतच्या काळात अपभ्रंश भाषा निर्माण झाल्या. त्या सुमारास पल्लव, गोपाळ, शक, अहीर वगैरे अन्य भाषेचे, अन्य धर्माचे व मानव वंशाचे लोक पंजाबमार्ग हिंदुस्थानात शिरले व हीन संस्कृतीमुळे आमच्यात मिसळून जाऊन आमच्या प्राकृत भाषा बोलू लागले, तेव्हा निरनिराळ्या अपभ्रंश भाषा उत्पन्न झाल्या. पुढे दहाव्या शतकाच्या सुमारास असाच भिन्न वंश संघर्ष पुन्हा घडून सध्याच्या हिंदी, बंगाली इत्यादी आर्यभाषा जन्माला आल्या व त्याच रीतीने महाराष्ट्र अपभ्रंशापासून मराठी उत्पन्न झाली.

प्राकृत हीच महाराष्ट्री
 डॉ. ए. एम्. घाटगे - डेक्कन कॉलेज, पुणे-यांनी आपल्या 'महाराष्ट्र : लँगवेज अँड लिटरेचर' या लेखात महाराष्ट्र हेच महाराष्ट्रीचे जन्मस्थान, या मताला पुष्टी दिली आहे (जर्नल ऑफ दि युनिव्हर्सिटी ऑफ बाँबे, व्हॉ. ४, विभाग ६, मे १९३६ ).