पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८१
स्वराज्य आणि स्वधर्म
 

राष्ट्रधर्म भागवतधर्मापेक्षा खूपच भिन्न होता हेही खरे आहे.

अनन्य साधारण
 ही भिन्नता कशात आहे हे डॉ. शं. दा. पेंडसे यांच्या शब्दांत प्रारंभीच सांगितले आहे. भागवतधर्माचे स्वरूप केवळ संरक्षक होते, ते धोरण टाकून देऊन महाराष्ट्रधर्माने चढाऊ व लढाऊ धोरण स्वीकारले, असे त्यांनी म्हटले आहे. दुसरे एक थोर पंडित साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांनी हा भेद जास्त विशद केला आहे. 'पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी' या आपल्या ग्रंथात (भाग १ ला प्रकरण १४ वे - श्री समर्थ रामदास) त्यांनी समर्थांच्या अनन्यसाधारण वैशिष्ट्यांचे स्वरूप चांगले स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, 'प्रत्यक्ष साऱ्या देशभर हिंडून व समाजनिरीक्षण करून लोकस्थितीचा अभ्यास करावा व नंतरच कार्याची पद्धती ठरवावी, असा सर्वंकष स्वरूपाचा विचार समर्थांपूर्वी, प्रत्यक्ष कोणाच्या आचरणातून तरी दिसत नाही.' (पृ. ३४४) 'परकीय यवन, पोर्तुगीजांसारखे लुटारू, स्वकीय पुंड, पाळेगार इ. तत्कालीन अत्याचाऱ्यांच्या अत्याचारांचे समर्थांनी जसे बारकाईने वर्णन केले आहे तसे कोणीही केलेले नाही.' (पृ. २४७) 'सामाजिक जीवनाची दुर्दशा व अधःपात थांबविता येत नसेल तर आपल्या साक्षात्कारी जीवनाचा व आध्यात्मिक विकसनाचा आपल्या राष्ट्राला लाभ कोणता, असे त्यांना (समर्थांना) वाटू लागले. प्रत्यक्ष निर्गुण निराकार परब्रहा सगुण साकार होऊन अवतार घेते तर ब्रह्मनिष्ठांना तरी संस्कृतीच्या, समाजाच्या व राष्ट्राच्या अधःपतनाच्या काळात केवळ निजानंदात निमग्न होऊन कसे राहता येईल ? परमेश्वरी नियमाचे ते उल्लंघनच नव्हे काय ? समाजजीवनाच्या या एका तपावर केलेल्या मनन- निरीक्षणाने त्यांची (समर्थांची) अशी धारणा झाली की स्वराज्यावाचून स्वधर्म व स्वराष्ट्र यांचे संरक्षण व विकसन केवळ अशक्य होय. सामर्थ्याच्या पार्श्वभूमीवाचून अध्यात्माला महत्त्व नाही, जीवनाला प्रतिष्ठा नाही व नीतिमूल्यांना स्थिरता नाही.' (पृ ३५१) 'या राष्ट्राला व धर्माला वैभवशाली व सामर्थ्यसंपन्न कसे करता येईल या एकाच विचारात समर्थ गढून गेले होते.' (पृ. ३५७) 'त्यांच्यापूर्वी राष्ट्रपुनरुत्थानाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून व त्यासाठी वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा आश्रय करून योजनाबद्ध कार्याची उभारणी करणारा अन्य कोणी आढळत नाही.' (पृ. ३५८).
 समर्थांच्या अनन्यसाधारण कार्याचे स्वरूप असे विशद करून बाळशास्त्री यांनी श्री व्यासांनंतरचा महान लोकशिक्षक असा त्यांचा गौरव केला आहे.
 (१) ऐहिक ऐश्वर्याची उत्कट आकांक्षा (२) आधी प्रपंच (३) लोकसंघटना (४) शक्ती प्रमाण हे (५) प्रयत्नवाद आणि (६) स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद ही जी महाराष्ट्रधर्माची सहा लक्षणे या दोन प्रकरणांत सांगितली तीच निराळ्या शब्दांत हरदास यांनी संकलितरूपाने आपल्या ग्रंथात सांगितली आहेत हे वरील अवतरणांवरून ध्यानात येईल. समर्थांच्या कार्याच्या विवेचनाचा याहून निराळा