पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३८०
 

ते मागे सांगितलेच आहे. देशभर भ्रमंती करताना समर्थांना हिंदूंची जी दारुण अवस्था दृष्टीस पडली तिच्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन झाले असले पाहिजे, असे या पंडितांनी म्हटले आहे. अर्थात हे केवळ अनुमान आहे. पण आहे या स्थितीत तेच जास्तीत जास्त समाधानकारक आहे, असे मला वाटते.
 दुसरा विचार समर्थांच्या साहित्याच्या रचनेविषयीचा आहे. हे साहित्य अत्यंत विस्कळित असे आहे. दासबोधातील समासाचे नाव व आतला विषय यांचा पुष्कळ वेळा मेळ बसत नाही. समसातील एका ओवीचा अनेक वेळा दुसरीशी संबंध नसतो. इतकेच नव्हे, तर एकाच ओवीतील पूर्वार्धाचा उत्तरार्थाशी संबंध नसतो. त्यांच्या इतर स्फुट प्रकरणांत इतका गोंधळ नाही. पण तरी ते सुव्यवस्थित, निर्वाचित, चांगले बांधलेले आहे, असे म्हणता येत नाही. समर्थांच्या वाङ्मयात हा फार मोठा दोष आहे यात शंका नाही आणि त्यामुळे त्यांच्या वचनांचा आधार घेताना मागचा पुढचा संदर्भ पाहणे याला काही अर्थच राहात नाही. पण असे असले तरी, त्यांच्या महाराष्ट्रधर्माचे जे सिद्धात येथे सांगितले आहेत, त्यांविषयी मात्र यतकिंचितही गोंधळ नाही. कारण त्या त्या समासातील व प्रकरणातील सिद्धान्त वादातीत आहेत. या सिद्धांताचे विवरण करताना इतर जी अनेक वचने दिलेली आहेत त्यातील काही विषयी संदर्भाच्या प्रश्नावरून वाद करता येईल हे खरे; पण त्यामुळे समर्थांच्या मूळ तत्वज्ञानाविषयी संदेह घेण्यास जागा निर्माण होते, असे मात्र नाही.
 समर्थांच्या कार्याचे प्रस्तुततेचे विवेचन वाचताना हे दोन विचार वाचकांनी नित्य ध्यानात वागवावे अशी विनंती आहे. ]
 समर्थांच्या महाराष्ट्रधर्माचे गेल्या व या प्रकरणात सविस्तर विवेचन केले. गेल्य प्रकरणात या महाराष्ट्रधर्माची चारपाच लक्षणे सांगितली. आणि 'स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद' हे जे सहावे लक्षण ते या प्रकरणात सांगून त्याचा सविस्तर ऊहापोह येथे केला. कारण स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद हा महाराष्ट्रधर्माचा आत्माच आहे. बाकीची लक्षणे ही त्याचीच अंगभूत लक्षणे होत. या लक्षणांवरून वारकरी संतांचा भागवतधर्म व समर्थांचा महाराष्ट्रधर्म यात काय भेद आहे हे स्पष्ट होईल.

तुलना
 भागवतधर्माहून महाराष्ट्रधर्म वेगळा असला तरी ज्ञानेश्वर, तुकारामांनी प्रतिपादिलेल्या तत्त्वाच्या पायावरच आणि त्यांच्या आधारेच समर्थांचा महाराष्ट्रधर्म उभा आहे यात शंका नाही. वैदिक धर्माचा अभिमान समाजात जागृत ठेवून तीनशे वर्षे संतांनी महाराष्ट्रीयांची अस्मिता जिवंत ठेवली. नीतिनिष्ठा, भूतसेवा, परमेश्वरावरील श्रद्धा ही श्रेष्ठ धर्माची तत्त्वे सांगून समाजाचे मन उन्नत करून ठेवले, म्हणूनच समर्थांना महाराष्ट्रधर्माचा प्रसार द्रुतगतीने करता आला. स्वतः समर्थ हे भागवतधर्मीय संत होते हे प्रा. श्री. म. माटे यांचे मत या अर्थाने खरेच आहे. तरीही त्यांचा महा-