पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७९
स्वराज्य आणि स्वधर्म
 

करून समर्थांनी जी चळवळ चालविली होती तिचा त्यांना पत्ता नसेल, आणि पत्ता असूनही आपल्या उद्दिष्टांना इतकी साह्यभूत होणारी चळवळ करणाऱ्या पुरुषाशी प्रारंभापासून त्यांनी संपर्क साधला नसेल, असे समजणे हे अत्यंत हास्यास्पद आहे. सिद्धेश्वर भट ब्रह्मे यांसारख्या केवळ पारमार्थिक अधिकारी असलेल्या सत्पुरुषाचा छत्रपती परामर्श घेतात आणि 'स्वामींच्या अनुष्ठानबळे राज्याधिकारी झालो' असे त्यांना नम्रपणे लिहितात (पत्र ता. १७– ७- १६५३). मग इह आणि पर या दोन्ही क्षेत्रांत ज्यांचा अधिकार त्यांना स्पष्ट दिसत होता त्या समर्थांची भेट त्यांनी प्रारंभीच्या काळात घेतली नसेल ही कल्पना टिकणे कसे शक्य आहे ? असो. पण हा विचार गौण वाटतो. शिवछत्रपतींच्या हातून स्वराज्य स्थापना करणे हे रामदासस्वामींचे कार्य नव्हतेच. त्यांनी महाराष्ट्रात लोकसंघटना केली व लोकांत राष्ट्रधर्माचा प्रसार करून लोकमानसात क्रांती घडवून आणली हे त्यांचे महत्त्वाचे कार्य होय. आणि ते त्यांनी कसे घडवून आणले याचेच विवेचन येथवर केले आहे.
 [ समर्थांच्या ज्या साहित्याच्या आधारे त्यांच्या कार्याचे विवेचन आपण करतो त्याच्या विषयी एकदोन विचार येथे सांगणे अवश्य आहे असे वाटते. समर्थांनी प्रवृत्ति- धर्म सांगितला, शक्ती, धन, ऐहिक ऐश्वर्य यांचे महत्त्व सांगितले, त्यांनी राजकारण केले हे सर्व अगदी खरे आहे. पण त्यांनी निवृत्तिपरही पुष्कळ लिहिले आहे. त्यांनी भागवतधर्मीय संतांप्रमाणेच संसाराची अतिरेकी निंदाही केली आहे. प्रपंच आणि मोक्ष यात विरोध आहे, असे विचारही मांडलेले आहेत. आणि हे प्रतिपादन करणारे जे त्यांचे साहित्य त्याचे प्रमाणही कमी नाही. यामुळे इतर संतांहून ते निराळे कसे, असा पुष्कळांना प्रश्न पडतो. पण त्या प्रकारचे त्यांचे वाङ्मय विपुल प्रमाणात असले तरी संभ्रम पडावा अशी मात्र स्थिती नाही. कारण प्रवृत्तिधर्मीय जे विचार, जे तत्त्वज्ञान त्यांनी सांगितले आहे ते अगदी स्पष्ट आणि अगदी निर्णायक आहे. त्याविषयी, त्यांच्या ऐहिक तत्त्वज्ञानाविषयी शंका घेण्यास अणुमात्र जागा नाही. पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की मठस्थापना करून व महंताची संघटना घडवून समर्थांनी सर्व महाराष्ट्रात त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याची व्यवस्था केली. त्यांना ऐहिक प्रपंचाचे जे विज्ञान सांगावयाचे होते त्याविषयी त्यांनी लिहिलेल्या साहित्याचे प्रमाण थोडे असले तरी, शतमुखांनी जे प्रपंचविज्ञानाचे तत्त्वज्ञान त्यांनी वदविले त्याचे प्रमाण शतसहस्रपटीने जास्त आहे. तेव्हा लिखित साहित्याच्या त्यांच्या प्रवृत्तिधर्माच्या प्रतिपादनाचे प्रमाण कमी असले तरी, मौलिक साहित्याच्या दृष्टीने पाहता ते निवृत्तीच्या प्रतिपादनाच्या तुलनेने अनंतपटीने जास्त आहे. आणि म्हणूनच समर्थाच्या प्रवृत्ति परतेविषयी शंका घेण्यास जागा राहत नाही.
 निवृत्तीचे अगदी उत्कट प्रतिपादन आणि प्रवृत्तीचेही तितकेच उत्कट प्रतिपादन असे करणे ही फार मोठी विसंगती आहे हे खरे आहे. पण अलीकडच्या डॉ. पेंडसे, प्रा. माटे इ. विद्वानांनी या विसंगतीचा परिहार करण्याचा कसा प्रयत्न केला आहे