पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
१२
 

ते बरेचसे सयुक्तिक असावे असे वाटते. आर्य लोक जसजसे भिन्न प्रदेशांत जात आणि आपली राज्ये स्थापून आपल्या संस्कृतीचा प्रसार करीत तसतसा त्यांची जी ग्रांथिक संस्कृत व संस्कृतसम बोलीभाषा तिचा मूळ समाजाच्या भाषांशी संबंध येई आणि त्यातून प्रांतोप्रांती प्राकृत भाषा निर्माण होत. मथुरेभोवतालचा जो शूरसेन प्रांत तेथे अशा प्रकारे निर्माण झालेली ती शौरसेनी, मगधात झालेली ती मागधी व महाराष्ट्रात झालेली ती महारष्ट्री हे मत आता सर्वमान्य होत आले आहे.

महाराष्ट्री महाराष्ट्राची
 कुलगुरु चिंतामणराव वैद्य यांनी आपल्या ठाणे-ग्रंथसंग्रहालय (इ. स. १९०६ ), पुणे - ग्रंथकार संमेलन (इ. स. १९०८ ) व बडोदे - साहित्य संमेलन (१९०९) येथील भाषणात हाच सिद्धान्त मांडला आहे. त्यांनी प्राकृत व्याकरणकारांचा आधारही दिला आहे. विंध्याच्या उत्तरेस शौरशेनी व मागधी या संस्कृताचा अपभ्रंश होऊन निर्माण झाल्या व महाराष्ट्रात संस्कृताचा अपभ्रंश होऊन जी भाषा निर्माण झाली तीच महाराष्ट्री, असे प्राकृत व्याकरणकारांचे मत आहे. यांतील संस्कृताचा अपभ्रंश होऊन प्राकृत भाषा निघाल्या, हे मत आता मान्य नाही. वैदिक संस्कृत व पाणिनीय संस्कृत यांच्या काळी उत्तर भारतातही बहुजनांची निराळी भाषा होती. तिच्यावर संस्कृतचे वर्चस्व होते हे खरे. पण ती भाषा होती. चिंतामणरावांच्या मते आर्य दक्षिणेत आले तेव्हा संस्कृत भाषा मृतच होती. ती फक्त ग्रंथात चालू होती. आर्यांची बोलण्याची भाषा तिच्याहून भिन्न होती. त्या भाषेला महाराष्ट्रात विशिष्ट रूप येऊन तिची महाराष्ट्र प्राकृत भाषा झाली.
 काही पंडितांच्या मते महाराष्ट्री ही शौरसेनीवरून निघाली तर काहींच्या मते ती अर्धमागधीवरून निघाली. डॉ. हन्र्ले या पंडिताच्या मते महाराष्ट्री ही गंगायमुना यांच्या परिसरातील- म्हणजे मोठ्या देशातील भाषा होय. तिला महाराष्ट्री नाव यामुळेच पडले. तिचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. डॉ. ग्रियरसन या थोर भाषापंडिताचे प्रारंभी असेच मत होते. पण पुढे त्याचे मत बदलले. डॉ. स्टेन को नौ (ख्रिश्चानिया विद्यापीठ, नॉर्वे) यांनी आपल्या 'महाराष्ट्री व मराठी' या लेखात, प्राकृत व्याकरणकारांचे परंपरागत मत हेच सयुक्तिक आहे व महाराष्ट्र व महाराष्ट्री यांचा दृढ संबंध आहे असे मत मांडले आहे. महाराष्ट्री व मराठी यांचा पाया एकच आहे, असे सांगून डॉ. भांडारकर, गॅरेंज, जाकोबी, कुन्ह, पिशेल, इ. पंडितांचे हेच मत असल्याचे त्याने सांगितले आहे. ( इंडियन ॲंटिक्वेरी, व्हॉ. ३२, इ. १९०३ ) ग्रियरसननेही या मताला नंतर मान्यता दिली, हे वर सांगितलेच आहे.
 महाराष्ट्री ही महाराष्ट्राचीच भाषा होय, असे मत राजाराम रामकृष्ण भागवत यांनीही आपल्या 'प्राकृत भाषेची विचिकित्सा' या निबंधात मांडले आहे. त्यांच्या मते महाराष्ट्री ही संस्कृतापासून उद्भवली हे खरे, पण ती लौकिक संस्कृतापासून नव्हे,