पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३७४
 


ब्राह्मण्य
 पण ब्राह्मण तरुणांना आवाहन करताना, त्यांचा त्यांच्या ब्राह्मणत्वावर भर नसून तो त्यांच्या ब्राह्मण्यावर होता. भक्ती-वैराग्य, ज्ञान, स्वाध्याय, तपश्चर्या, शुचिता, शांती या गुणांना समर्थ ब्राह्मण्य म्हणतात. (टाकळीला लिहिलेले पत्र, डॉ. पेंडसे, राजगुरू समर्थ रामदास, पृ. २९८) दासबोधात त्यांनी हाच भावार्थ सांगितला आहे. 'करिती ब्राह्मण्य निरुपण । जाणती ब्रहा संपूर्ण । तेचि जाणावे ब्राह्मण । ब्रह्मविद ॥' (६-४-२४) त्यांच्या काळच्या ब्राह्मणांच्या ठायी हे ब्राह्मण्य नव्हते, म्हणून समर्थांनी त्यांच्यावर कडक टीका केली आहे. ते म्हणतात, 'सध्याचे ब्राह्मण बुद्धीपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले । गुरुत्व सांडून जाले । शिष्य शिष्यांचे ॥' त्या ब्राह्मणांचा इतका अधःपात झाला होता की त्यांपैकी कित्येक आपल्या देवता टाकून मुसलमानाच्या देवतांना भजू लागले होते. 'कित्येक दावल मलकास जाती । कित्येक पीरासचि भजती । कित्येक तुरुक होती । आपल्या इच्छेने ॥' आणि असे असून त्यांना आपण श्रेष्ठ असा अभिमान मात्र मोठा होता. अशा ब्राह्मणांना समर्थांनी मूर्ख म्हटले आहे, याहीपुढे जाऊन मागच्या अनेक पिढ्यांचे ब्राह्मण भ्रष्ट होते अशीही टीका समर्थांनी केली आहे. ते दुःखाने म्हणतात, आम्ही त्याच जातीचे ब्राह्मण आहो- 'आम्हीही तेच ब्राह्मण । दुःखे बोलीले हे वचन । वडिल गेले ग्रामणी करून । आम्हा भोवते ॥' पण या पूर्वज ब्राह्मणांना बोलावे तरी कसे ? ब्राह्मणांचे नशीब असे, म्हणून गप्प बसावे हेच खरे (दास. १४-८).
 असे म्हणून, पुढच्याच समासात ते म्हणतात, हे झाले ते होऊन गेले, पण आता तरी ब्राह्मणांनी शहाणपणाचा मार्ग धरावा. तो मार्ग कोणता ? तर प्राणिमात्राच्या ठायी जो परमेश्वर आहे त्याची भक्ती, त्याची पूजा करावी. 'देव वर्ततो जगदंतरी । तोचि आपुले अंतरी । त्रैलोकीचे प्राणिमात्री । बरे पहा ॥' असे सांगून येथे पुन्हा ब्राह्मण्याची लक्षणे समर्थांनी सांगितली आहेत.

आगंतुक गुण
 वर्ण व जाती समर्थ मानीत असले तरी, प्रयत्नाने अंगी गुणसंपदा आणता येते, अशी त्यांची श्रद्धा होती. आणि गुणसंपदेने जो श्रेष्ठ कार्य करील तो श्रेष्ठ, हीन कार्य करील तो हीन, असे त्यांनी म्हटले आहे. काळा मनुष्य गोरा होऊ शकत नाही, मुका बोलू शकत नाही, कुरूप पालटता येत नाही; पण 'उत्तम गुण अभ्यासता येती, शहाणपण सिकता येते, कारभार करिता उमजते, सर्व काही.' असा अनुभव नित्य येत असताना, तुम्ही स्वहित का करीत नाही ? अंतर्कळा का शृंगारीत नाही ? कष्ट करून, प्रयत्न करून संपदा मिळवा आणि मग सावकाश तिचा उपभोग घ्या. प्रयत्नांनी मिळविलेल्या या गुणांनाच समर्थ 'आगंतुक' गुण म्हणतात. यांनाच ते चातुर्य