पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३६८
 

वैश्यधर्माचे सविस्तर विवेचन नाही, हे मात्र खरे आहे. (दुर्दैव असे की मराठ्यांना व्यापार, वैश्यधर्म, पेढ्या यांचे महत्त्व त्यांच्या सर्व कारकीर्दीतच कधी नीटसे उमगले नाही. याचा फार मोठा वाईट परिणाम मराठी रियासतीवर झालेला आहे. पण ते विवेचन पुढे येईल.)
 असो. राजधर्म आणि क्षात्रधर्म यांचे समर्थांचे विवरण आपण पाहिले. आता 'ब्राह्मणी करावा स्वधर्म' असे त्यांनी म्हटले आहे त्याचे स्वरूप काय ते पाहू.

नवे नेतृत्व
 ऐहिक ऐश्वर्याची आकांक्षा, प्रपंचाचे महत्त्व, लोकसंघटना, शक्तीची-बलाची उपासना, प्रयत्नवाद, स्वराज्य हे जे महाराष्ट्रधर्माचे तत्त्वज्ञान येथवर सांगितले त्याच्या प्रसारासाठी, ते लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी समर्थांनी महाराष्ट्रात नवे नेतृत्व निर्माण केले, हे त्यांचे अनन्यसामान्य असे कार्य होय. हे नेते म्हणजेच महंत. समर्थांनी केवळ हे नेते तयार केले असे नाही तर त्यांच्याकरवी सर्व महाराष्ट्रभर अनेक मठ स्थापन करून तेथून या नव्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याची व्यवस्था करून ठेवली. भारतात प्राचीन काळी गौतमबुद्धांनी धर्मप्रसाराचा असा संघटित प्रयत्न केला होता. त्याच्या आधी रामाच्या काळी आर्य ऋषी दक्षिणेत जाऊन आश्रम स्थापून वैदिक धर्माचा असाच प्रयत्न करीत असत. पण ती इतिहासपूर्व काळातली गोष्ट होय. तिची तपशिलवार माहिती आपल्याला नाही. ऐतिहासिक काळातला प्रयत्न म्हणजे भगवान गौतम बुद्ध यांचाच होय. त्यानंतर दीडदोन हजार वर्षात असा प्रयत्न झाल्याचे आढळत नाही. सतराव्या शतकात समर्थांनी प्राचीन आर्य ऋषींच्या त्या आश्रमसंस्थेचे पुनरुज्जीवन केले. मठ-महंत ही त्यांची संस्था या स्वरूपाची होती.

मठांचे जाळे
 नवे नेतृत्व निर्माण करण्याचे हे प्रयत्न समर्थांनी अतिशय पद्धतशीरपणे केले. दिनकरस्वामी, गिरिधरस्वामी, आत्मारामस्वामी असे काही महंत त्यांना मिळताच, त्यांनी अनेक ठिकाणी मठस्थापना केली आणि महंतांना एक आज्ञापत्र काढले व त्यांना सांगितले की आपल्या सोयऱ्याधायऱ्यांची, निकटवर्तीयांची, बुद्धिमान, चलाख मुले आपल्या भोवती जमवा. त्यांच्या सुखदुःखाशी एकरूप व्हा, त्यांची परीक्षा करा आणि त्यांतली निवडक मुले आमच्याकडे पाठवा. 'मग तयाचा सकळ गोवा आम्ही घेऊ' (श्री सांप्रदायिक विविध विषय, खंड १ ला, शं. श्री. देव). 'महंते महंत करावे, युक्ति बुद्धीने भरावे, जाणते करूनि विखरावे, नाना देसी ॥' अशी ही योजना होती. एका महंताने आणखी महंत तयार करावयाचे व सर्व देशभर मठांचे जाळे विणावयाचे. गिरिधरस्वामींनी समर्थप्रतापात दिलेल्या माहितीप्रमाणे, हे बहुतेक काम काम गुप्तपणे चालत असे. वरून दिसायला ही संघटना धार्मिक स्वरूपाची होती, पण