पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६७
स्वराज्य आणि स्वधर्म
 

सर्वनाश ओढवतो. राजकारणात अवश्य तेथे विश्वासघात केलाच पाहिजे. 'इंद्राने नमुचीशी मैत्रीचा तह करून वेळ येताच त्याला ठार केले' असे सांगून महाभारतकार म्हणतात, हीच 'रिपौ वृत्तिः ।' शत्रूशी वागण्याची नीती सनातन आहे. श्रीकृष्ण म्हणतात, युधिष्ठिरा, 'मायावी मायया वध्यः ।' कपटी मनुष्याचा कपटानेच वध केला पाहिजे. पूर्वी देवांनी असुरांना मायेने, कपटानेच जिंकले होते. समर्थांनी म्हटले आहे, तेच- पूर्वी जे मारिले होते- असुर दैत्य आज पुन्हा आले आहेत. तेव्हा, 'धटासि आणावा धट । उद्धटासि उद्धट । खटनटासि खटनट । अगत्य करी ॥ जैशासि तैसा जेव्हा भेटे । तेव्हा मजालसी बरी धाटे ॥' (दासबोध १९.९)
 समर्थांनी उपदेशिलेली राजनीती ही अशी आहे. क्षत्रियांच्या बाहुबलाला या राजनीतीची जोड दिल्यावाचून शत्रूवर विजय मिळविता येत नाही. म्हणून शक्ती आणि युक्ती या दोन्हींचा योग झाला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

रमा धर्मसमागमे
 समर्थांनी राजधर्माचे विवेचन केले (राजाची कर्तव्ये असा येथे अर्थ आहे. मागे महाभारतातील राजधर्माचा उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ सर्व राजकारण असा आहे.) क्षात्रधर्माचे विवेचन केले आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मणधर्म आणि सेवकधर्म यांचेही प्रतिपादन त्यांनी केले आहे (ते पुढे सविस्तर दिले आहे). पण वर्णाश्रमधर्माचा पूर्ण अभिमान असूनही त्यांनी वैश्यधर्माचे विवेचन कोठे केलेले नाही. त्या काळी क्षत्रिय आणि ब्राह्मण हेच दोन वर्ण समाजात प्रमुख होते, म्हणून समर्थांनी त्यांनाच आवाहन केले, असे विद्वान लोक सांगतात. पण समर्थांनी सेवकधर्माचे जसे विवेचन केले, तसेच वैश्य धर्माचेही करणे अवश्य होते. वैश्यवर्ण त्या काळी अग्रभागी नव्हता, हे खरे. पण ही दुर्दैवाची गोष्ट होती. इ. सनाच्या पहिल्या हजार वर्षात वैश्यवर्ण फारच पुढारलेला होता आणि समाजात त्याला फार मोठी प्रतिष्ठा होती. महाभारतात राजाचे मंत्रिमंडळात चार ब्राह्मण, आठ क्षत्रिय आणि एकवीस वैश्य असावे, असे सांगितले आहे. तीन मंत्री शूद्र वर्णाचे असावे, असेही तेथे आहे. तेव्हा वैश्यधर्माचे प्रतिपादन अवश्य होते यात शंकाच नाही. पण समर्थांनी ते केलेले नाही. मात्र कोश, लक्ष्मी, संपत्ती यांचे स्वराज्याच्या दृष्टीने महत्त्वच त्यांनी जाणले नव्हते असे नाही. 'प्रपंची पाहिजे सुवर्ण' असे त्यांनी सांगितलेच आहे. त्यांनी स्वतःचे स्वप्न जे 'आनंदवनभुवन' या काव्यात सांगितले आहे तेथील वचन जास्त उद्बोधक आहे. म्लेंच्छदैत्य बुडाले, अभक्तांचा क्षयो झाला, आणि मग काय झाले ? तेथुनि वाढल धर्मू- आणि 'रमा धर्मसमागमे !' या वचनाला फार महत्त्व आहे. धर्म आणि रमा म्हणजे लक्ष्मी, संपत्ती यांचा निवृत्तिपंथीय लोक नेहमी विरोध मानतात. पण धर्माबरोबरच लक्ष्मीही वाढली, असे समर्थ म्हणतात. यावरून त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. शिवाय लोकांनी लक्ष्मीवंत व्हावे, असे त्यांनी अधूनमधून सांगितले आहेच. पण