पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३६४
 

सोडणे । कित्येक लोक ॥' छत्रपतींनी तान्हाजी, नेताजी, मोरोपंत, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, अण्णाजी दत्तो अशा अनेक धुरा निर्माण केल्या. म्हणूनच त्यांना अल्पावधीत हिंदवी स्वराज्याचा प्रचंड व्याप साधता आला. हे सर्व लोक जिवास जीव देणारे होते. समर्थांनी म्हटले आहे, 'मोहरा पेटला अभिमाना । मग तो जिवास पाहेना । मोहरे मिळवून नाना । वरी चपेटे करी ॥'
 या सर्व उपदेशात समर्थांचे एक महत्त्वाचे सूत्र आहे. 'लोक राजी राखणे.' 'मनुष्य राजी राखणे । हीच भाग्याची लक्षणे.' संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी हेच वारंवार सांगितले आहे. 'राजी राखता जग । मग कार्यासी लगबग !' असे लोक पाठीशी असले म्हणजे 'आधी गाजवावे तडाखे । मग भूमंडळ धाके' हे शक्य होते. 'बहुत लोक मेळवावे, एक विचारे भरावे, कष्टे करोनि घसरावे, म्लेंच्छावरी.' आणि या मार्गाचा अवलंब करून 'महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे.'
 हे राजधर्माचे विवेचन झाले. याबरोबरच समर्थांनी क्षात्रधर्म, ब्राह्मणधर्म आणि सेवकधर्म यांचेही विवरण केले आहे. कारण 'मराठा तेवढा मेळवावा' हे त्यांचे अंतिम साध्य होते. सर्व महाराष्ट्र, अखिल जनता त्यांना जागी करावयाची होती. येथे त्यांना राष्ट्र निर्मावयाचे होते. म्हणून सर्वांनाच त्यांनी आपापला धर्म काय ते विवरून सांगितले आहे.

क्षात्रधर्म
 'क्षात्रधर्म' हे त्यांचे एक स्वतंत्र प्रकरणच आहे. क्षत्रियाचा पहिला श्रेष्ठ धर्म म्हणजे प्राणपणाने रणात झुंजणे हा होय. समर्थ म्हणतात, ज्याला जिवाचे भय वाटते त्याने क्षात्रधर्म करू नये, दुसरा काही उद्योग करून पोट भरावे. खरा क्षत्रिय कसा असतो ? 'जैसा भांड्याचा गलोला.' जसा तोफेचा गोळा ! तो जसा निर्भयपणे शत्रुसैन्यावर आदळतो- 'तैसा क्षत्रिय रिचवला । परसैन्यामध्ये.' अशा प्रकारे जिवावर उदार होऊन, 'मारता मारता मरावे । तेगे गतीस पावावे । फिरोनि येता भोगावे ।महद्भाग्य ॥' स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद हा समर्थांच्या मनात किती ठसला होता हे या 'क्षात्रधर्म' प्रकरणावरून दिसून येईल. हे जे युद्ध करावयाचे ते कशासाठी ? धर्मसंस्थापनेसाठी ! हा हलकल्लोळ करावयाचा तो देव मस्तकी धरून करावयाचा. 'देवद्रोही जितुके कुत्ते । ते मारूनि घालावे परते । देवदास पावती फत्ते । यदर्थी संशय नाही ॥' समर्थांनी आपल्या मनाची खंत अनेक परींनी प्रगट केली आहे. 'देवमात्र उच्छेदिला जित्यापरीस मृत्यु आला ॥' अशी सगळ्या देशाची स्थिती झाली आहे. बरे घरी राहून काय मरण चुकणार आहे काय ? 'मरणहाक तो चुकेना । देह वाचविता वाचेना ॥' मग रणांगणात पडलेला देह काय वाईट ? म्हणून 'युद्ध करावे खणखणारे सीमा सांडूनी ॥' आणि 'आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा ॥'