पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१८.
स्वराज्य आणि स्वधर्म
 



 महाराष्ट्र राज्य किंवा स्वराज्य हे समर्थांच्या महाराष्ट्रधर्माचे सहावे लक्षण होय. स्वराज्य आणि स्वधर्म यांचा अभेद प्राचीन काळी भारतात मानलेला होता. वेद आणि महाभारत यांत धर्मकारणात राजकारण म्हणजेच स्वराज्य, साम्राज्य यांचा नेहमीच समावेश केलेला आढळतो. महाभारतात तर राजधर्मातच सर्व धर्मांचा समावेश होतो असे सांगितले आहे, याचा निर्देश वर केलेलाच आहे. ही थोर प्राचीन परंपरा मध्यंतरी लुप्त झाली. शास्त्रीपंडितांनी तर धर्म म्हणजे कर्मकांड असाच सिद्धान्त केला आणि मोठमोठ्या पीठांचे आचार्य आणि संत यांनी निवृत्तीच्या अंगावर सर्व भर दिला. त्यामुळे या देशाचे स्वातंत्र्य लुप्त झाले आणि त्याची चिंता कोणीच वाहीनासे झाले. समर्थांना हा अधःपात स्पष्ट दिसू लागला, म्हणूनच त्यांनी मराठ्यांना संदेश दिला - 'महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ॥' लोकसंघटना, शक्तीची उपासना, प्रयत्न, साक्षेप, सावधता ही सर्वसिद्धता अंतिम प्राप्तव्यासाठीच होती.

मराठ्यांचा राजा
 महाराष्ट्र राज्य करावयाचे असेल तर त्यासाठी प्रथम मराठ्यांचा राजा असला पाहिजे. त्या वेळचे सर्व मराठे सरदार यवन सेवेतच धन्यता मानीत होते. पण भारत भ्रमण संपवून, महाराष्ट्रधर्माचे तत्त्वज्ञान मनाशी निश्चित करून समर्थ महारष्ट्रात आले. त्यावेळी एका थोर राजाचा उदय होण्याची चिन्हे त्यांना दिसू लागली होती. उष:काल झाला होता आणि सूर्योदय निश्चित होणार, अशी आशा निर्माण झाली होती. म्हणून समर्थांनी आपल्या रामवरदायिनी मातेला, तुळजाभवानीला प्रार्थना केली-