पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६१
महाराष्ट्रधर्म
 

जात फार मोठे मानसिक परिवर्तन, फार मोठी क्रांती घडवावयाची होती. म्हणून ही बुद्धियोगाची, इहवादाची, व्यवहारवादाची, वास्तववादाची शिकवण ते सारखे देत होते. समर्थांनी राजधर्म, क्षात्रधर्म, ब्राह्मणधर्म, सेवकधर्म, असे धर्म भिन्नभिन्नपणे सांगितले आहेत. त्यांचे विवेचन पुढे येईलच. पण हा बुद्धियोगाचा प्रयत्नवादाचा, वास्तववादी, इहवादी धर्म त्यांनी सर्व लोकांना सांगितला आहे. वरील पद्धतीने याला आपण 'लोकधर्म' म्हणू. महाराष्ट्रधर्माचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण, त्यांनीच म्हटल्याप्रमाणे हे सर्व अवघे आंधळे लोक डोळस झाल्यावाचून राजे, सरदार, ब्राह्मण हे काही करू शकले नसते.
 लोक धूर्त व्हावे, तार्किक, दक्ष, सावध, विवेकी व्हावे, त्यांचा भोळसटपणा, अंधश्रद्धा, भाबडेपणा समूळ निपटून निघावा असे समर्थांचे प्रयत्न होते. म्हणून त्या मागल्या काळात, कुटुंबात खालच्या मानेने वडिलांचा अधिकार मानला जात असे त्या काळात, त्यांनी स्पष्टपणे परखडपणे लोकांना बजावले की माणूस लहान किंवा थोर हा बुद्धीमुळे, विवेकामुळे होतो, वयामुळे नाही. वृद्ध लोक हे आधी उपजले म्हणून त्यांना वडील म्हणतात. 'गुणेवीण वडीलपण । हे तो अवघेचि अप्रमाण ॥ वये धाकुटा नृपती । वृद्ध तयास नमस्कार करिती ॥' तेव्हा हे सर्व विवेकावर, बुद्धीवर, कर्तृत्वावर अबलंबून आहे. मनूसारखे चक्रवर्ती राजे झाले. त्यांना अवतार म्हणतात. पण त्यांचेही मोठेपण विवेकामुळे त्यांना लाभलेले होते. 'या कारणे कोणीयेके । शहाणपण सिकावे विवेके । विवेक न सिकता तुके । तुटोनि जाते ॥'
 हा शहाणपणा कशाने येतो ? 'व्याप आटोप करिती । धके चपेटे सोसिती । तेणे प्राणी सदेव (भाग्यवान) होती । देखत देखता ॥' (दास. १५-३) ज्याचा ज्याचा जो व्यापार । तेथे असावे खबर्दार । दुश्चितपणे (व्यापार केला) तरी पोर | वेढा ढावी (फसविते) ॥' प्रत्येकाला आपल्या प्रपंच व्यवसायाचे उत्तम ज्ञान असले पाहिजे. यासाठी रोज भोजन झाल्यावर माणसाने, 'येकांती जाऊन विवरावे । नाना ग्रंथ ॥ तरीच प्राणी शहाणा होतो । नाही तरी मूर्खचि राहतो । लोक खाती (वैभव भोगतात) आपण पहातो । दैन्यवाणा ॥'
 भारतात हेच झाले. मुस्लिम आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले. त्यांनी येथले सर्व वैभव भोगावयाचे आणि आपण ते दीनपणे पाहावयाचे !
 हे दैन्य, दारिद्र्य नष्ट व्हावे, हिंदुस्थान बळावून येथे लोकांना राज्यवैभवाची, समृद्धीची, लक्ष्मीची, यशाची पुन्हा प्राप्ती व्हावी यासाठीच समर्थांनी महाराष्ट्रधर्म सांगितला. त्याची अनेक लक्षणे येथवर सांगितली. आता 'स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद' हे जे सर्वात महत्त्वाचे लक्षण, त्याचे वर्णन करून समर्थांच्या कार्याचे विवेचन पूर्ण करावयाचे आहे. पुढील लेखाचा तोच विषय आहे.