पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३५९
महाराष्ट्रधर्म
 

राव्या शतकात समर्थांनी. हिंदूंचा अकराव्या शतकापासून जो अधःपात झाला तो त्या आंधळ्या धर्मामुळेच झाला. समर्थांनी हेच सांगितले आहे. जीवजंतू जितका देशकाल पाहतात, तितकासुद्धा माणसाने पाहू नये, याचा अर्थ काय ? सुखी कोण होतो ? जो खबरदार आहे तो, आणि दुःखी कोण होतो ? जो बेखबर आहे तो. 'चाळणेचा आळस केला तरी अवचित पडेल घाला, ते वेळे सावरायाला अवकाश कैचा.' ही अखंड चाळणा करणे भारतातील शास्त्रीपंडित व राजे यांनी सोडून दिले होते. परदेशगमन बंद, म्हणून तेथली वार्ता नाही. मुस्लिम आक्रमणाला तोंड देण्याची मुळीच तयारी नाही. त्याविषयीची अगाऊ वार्ता नाही, आक्रमकांच्या शस्त्रास्त्रांची, संघटना- शक्तीची, धार्मिक आकांक्षांची कल्पनाही येथल्या नेत्यांना नव्हती. सर्वनाश झाला तो त्यामुळे 'म्हणोनि सावधपणे । प्रपंच परमार्थ करणे । ऐसे न करता भोगणे । नाना दुःखे ॥ जो सर्व सावधान । धन्य तयाचे महिमान । जनी राखे समाधान । तोचि येक ॥' (दासबोध, १२-१).

बुद्धियोग
 एक कवनात समर्थांनी बुद्धियोगाचे महत्त्व सांगितले आहे. त्याचा भावार्थ हाच आहे. 'इहलोकी परलोकी, बुद्धियोगचि पाहिजे ॥' या बुद्धियोगाचा भावार्थ काय ? 'तार्किक असावा प्राणी, सावधान चहूकडे । हिंडता शहाणे होते, घरीच बैसता खोटे । हिंडता पारखी लोका, कार्यकर्ता जिवी धरी ॥' प्रसंगी वर्तता आले पाहिजे, यथातथ्य सुचले पाहिजे. आपला शत्रू कोण, मित्र कोण समजले पाहिजे. 'विचार जाणतो मोठा, दक्ष तो जाणता जनी । येके स्थळी स्थिरावेना, नित्यनूतन साजिरा । कीर्ती ते दिगंती धावे, नेमस्त राहता जनी ॥' (समर्थ ग्रंथभांडार, उत्तरार्ध, पृ. ३९०) या विभागातील स्फुट प्रकरणांत समर्थानी सारखा साक्षेप, सावधपण, जाणपण, बुद्धी यांचा घोष चालविलेला दिसतो. जाणता कोण ? चुकेना, ठकेना कामी. जो चुकत नाही आणि जो फसत नाही तो जाणता. अकराव्या शतकापासून फसणे हाच भारताचा इतिहास आहे. 'प्रपंच नेणता वेडा । जाणता देव बोलिजे ॥ जाणता लोक भाग्याचा, नेणता दरिद्री सदा ॥' कित्येक भाग्यशाली लोक पुढे करंटे होतात. याचे कारण काय ? 'बुद्धीचा भ्रंश होताहे । यालागी भाग्य जातसे ॥ करील व्याप तो भला । बहुत भाग्य लाधला । नसेल व्याप तो हळु । पडेल रे पळे पळू ॥ अखंड सावधानता । सभाग्य तो, नव्हे रिता । सखोल धारणा करी । उदंड चाळणा करी ॥'
 समर्थांच्या या प्रतिपादनाचा भावार्थ सप्तसमासीतील पुढील दोन ओव्यांत सामावला आहे.
 गयाळीपणे मूर्खपणे । संसारात दिसे उणे । विवेक जने या कारणे । आपुले स्वहित करावे ॥ इहलोकी संसार करावा । नाना यत्ने आटोपावा । लोकांमध्ये मिरवावा । पुरुषार्थ आपुला ॥