पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३५८
 

 राजकारण हे ऐहिक ऐश्वर्याचे साधन आहे. त्यासाठी देशकालवर्तमानाचे अचूक ज्ञान असले पाहिजे. त्यासाठीच सावधता व साक्षेप यांची आवश्यकता आहे. कारण प्रयत्न, उत्तम गुण, विद्या हे सर्व साक्षेपावाचून व्यर्थ ठरते. समर्थ म्हणतात, 'विद्या उदंड सिकला ।प्रसंगमान चुकतचि गेला । तरी मग तये विद्येला । कोण पुसे ?'

चुकणे दैत्य
 साक्षेप, सावधपण यांना रामदास धर्मच मानतात. त्यांनी, 'मूर्खा ऐसा पातकी कोणीच नाही,' असे म्हटले आहे. साधारणपणे, असत्य, हिंसा, चोरी, व्यभिचार यांना पातक मानतात. पण समर्थांनी ढिलेपणा, गलथानपणा यांनाही पातक मानले आहे. यावरून त्यांचा दृष्टिकोण स्पष्ट होतो. 'वन्ही तो चेतवावा रे' या त्यांच्या कवनात त्यांनी निक्षून सांगितले आहे 'अचूक यत्न तो देवो । चुकणे दैत्य जाणिजे । सावधू दव जाणावा । उन्मत्तु दैत्य बोलिजे ॥ साक्षपी वंश देवाचे । आळशी वंश दानवी ॥' हा विचार मराठीत अगदी अपूर्व असा आहे. कामात चूक करणे, बेसावध राहणे, आळस करणे हे दैत्य गुण आहेत असे पूर्वी कोणीही म्हटलेले नाही. भक्तिमार्गात भोळा भाव, भाबडी भक्ती, अज्ञान, निरागस बालभाव, याचाच उदो उदो केला जातो. पण व्यवहारात यांच्यामुळे अनर्थ होतो. अल्लाउद्दिन देवगिरीवर चाल करून आला, त्या वेळी रामदेवराव साक्षेपी असता, सावध असता, देशकालवर्तमान त्याने जाणले असते. प्रसंगमान तो चुकला नसता, तर यादवांचे राज्य बुडाले नसते. आणि ही फक्त यादवांचीच गोष्ट होती असे नाही. अकराव्या शतकापासून उत्तर दक्षिण सर्व हिंदुस्थानचीच ही गोष्ट आहे. येथे सर्व राजे आणि त्यांचे गुरू ब्राह्मण हे सर्व समर्थांच्या भाषेत दैत्यच झाले होते. हे जाणूनच समर्थांनी घोष चालविला होता. 'खबर्दार बरा राजा । विवेकी सर्वसाक्षपी', असावा. 'मोठे ते पाप लोकांचे । प्रभू तो जाणता नव्हे ॥'
 ,दासबोधात एक उत्तम दृष्टान्त देऊन समर्थांनी सावधपणाचे महत्त्व विशद केले आहे. झाडावरच्या पानावर आळी असते. ती पुढच्या पानावर जाताना, ती जागा सुरक्षित आहे ना हे पाहून मगच पाय उचलते. याप्रमाणे सामान्य 'जीवसृष्टी विवेके चाले' जीवजंतूसुद्धा परिस्थिती पाहतात, देशकालवर्तमान जाणून वागतात. पण मनुष्य ? हा मराठा? 'पुरुष होऊनी भ्रमले, या काय म्हणावे ?'

देशकाल - अभ्यास
 आठव्या शतकाच्या अखेरीपर्यंत देशकाल वर्तमान पाहून धर्मशास्त्र रचले जात असे. पुढे शंकराचार्यांची निवृत्ती, मीमांसकांचा अदृष्टफलधर्म आणि भागवतातील भोळी भक्ती यांमुळे हिंदूंचा धर्म परिस्थितिनिरपेक्ष झाला. या आंधळ्या धर्माला कर्नाटकात विद्यारण्यांनी चौदाव्या शतकात काहीसा आळा घातला आणि महाराष्ट्रात सत