पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३५२
 

आपले देव, धर्म, जीवनतत्त्वे ही निराळी आहेत, हा पृथगहंकार जागृत केला. आणि मग या शत्रूच्या सुलतानी सत्तेचे निर्दाळण करण्यासाठी मराठ्यांनी संघटित झाले पाहिजे हे सांगून सर्व महाराष्ट्राचा सामुदायिक अहंकार दृढबंध केला. समर्थांनी महाराष्ट्रात क्रांती केली ती हीच.

लोकशक्ती
 लो. टिळकांनी केसरीच्या पहिल्या अंकापासून सांगावयास प्रारंभ केला होता की लोक म्हणून एक अद्भुत शक्ती आहे. तिला राजे, सरदार, सेनापती भितात. समर्थांना नेमक्या याच शक्तीचे रहस्य कळले होते. म्हणून मठ, मंडळ्या स्थापून तेथे कार्यकुशल महंतांची नेमणूक करून त्यांनी ही शक्ती महाराष्ट्रात निर्माण करण्याचे भगीरथ प्रयत्न केले. यापूर्वी भारतात लोक या शक्तीची आराधना कोणी केली नव्हती. किंबहुना अशी एक अद्भुत नियामक शक्ती आहे हे कोणाच्या येथे गावीही नव्हते. 'मराठा तेवढा मेळवावा' या समर्थांच्या संदेशाचे हे रहस्य आहे.
 यापूर्वी भारतात अशा तऱ्हेचा राष्ट्रीय अहंकार निर्मिण्याचा प्रयत्न कोठेच झाला नव्हता. रजपूत तेवढा मेळवावा, कन्नड तेवढा मेळवावा, बंगाली, बिहारी, गुर्जर तेवढा मेळवावा असा मंत्र भारतात कोणी कधी सांगितलाच नव्हता. सिंध, पंजाब, बंगाल, गुजरात येथे अशा मंत्राची, अशा राष्ट्रीय संघटनेची फार जरूर होती. पण लोक ही शक्ती आहे ही जाणीवच तेथे कोणाला झाली नव्हती. समर्थांना महाराष्ट्रात ती झाली. त्यांचे द्रष्टेपण यातच आहे. रवीलाही जे दिसत नव्हते ते त्यांना दिसले.

बहुत जन
 महंतांना त्यांनी सारखा एक उपदेश चालविला होता. लोकांना जमवा, त्यांना शिकवून शहाणे करा. त्यांची संघटना करा आणि मग त्यांना राजकारणाला लावा. प्रारंभी राष्ट्र या तत्त्वाचे विवरण केले तेथे हे स्पष्ट केले आहे. देशाच्या उत्कर्षाची जबाबदारी प्रत्येकाच्या, सर्वांच्या, सर्व समाजाच्या शिरावर आहे, अशी जाणीव असलेला समाज म्हणजे राष्ट्र. हे राष्ट्र समर्थांना येथे निर्मावयाचे होते. म्हणून त्यांनी सांगितले की सर्वांना राजकारणाला लावा, राष्ट्रकार्याला लावा. आज आपण ज्यांना बहुजन समाज म्हणतो त्यांनाच समर्थ 'बहुत जन' असे म्हणत. विश्वजन, लोक, अवघे जग हेही शब्द त्यांनी वापरले आहेत. पण बहुजन हाच शब्द त्यांनी प्रामुख्याने वापरला आहे.
 'बहुतांचे समाधान राखावे, बहुतांस मानेल ते बोलावे', 'शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे', 'बहुतांचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे', 'जेणे बहुतांसि घडे भक्ती, ते हे रोकडी प्रबोध शक्ती, बहुतांचे मनोगत हाती, घेतले पाहिजे.' अशा या 'बहुतांना सांगाती घ्यावे, मानत मानत शिकवावे',