पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३५३
महाराष्ट्रधर्म
 

आणि मग त्यांचा समुदाव करावा. हा समुदाव कसा असावा ? 'अनन्य राहे समुदाव, इतर जनांस उपजे भाव, ऐसा आहे अभिप्राव, उपायाचा.' आपल्या भोवती जमलेले जन एकनिष्ठ राहावे आणि भोवतालच्या इतर जनांनाही त्या समुदायात येण्याची इच्छा व्हावी यासाठी 'संकेते लोक वेधावा.' लोक आल्यावर त्यांची सेवा करावी, त्यांचे सुखदुःख जाणावे, कारण 'जो बहुतांचे सोसीना, त्यास बहुत लोक मिळेना.' लोक महंताची, नेत्याची मनोमन परीक्षा करीत असतात. त्या कसोटीला महंताने, मठाधिपतीने टिकले पाहिजे. 'बहुती शोधून पाहिले, बहुतांच्या मनास आले, तरी मग जाणावे साधले, महत्कृत्या' बहुजन समाज जर आपल्याकडे वळला तर फार मोठे कार्य साधले असे समजावे. म्हणून, 'उत्तम गुण तितुके घ्यावे । घेऊनि जनास सिकवावे । उदंड समुदाय करावे । परी गुप्तरूपे ॥'
 लोक आपल्याकडे वळवावे, त्यांना शिकवावे आणि त्यांचा समुदाय करावा आणि मग - 'लोक समजोनि मग आज्ञा इच्छिती' आज्ञेची वाट पाहतात.

भूमंडळी सत्ता
 असा आज्ञापालन करणाऱ्या लोकांचा समुदाय हाताशी असला तर त्याचे फळ काय ? 'जो जगदंतरे मिळाला, तो जगदंतरचि झाला, अरत्री परत्री तयाला, काय उणे ?' मग अशा पुरुषाला या लोकी व परलोकी काही उणे पडणार नाही. जो स्वतःच जगदंतर झाला अशा पुरुषाला 'सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येती.' आणि अशा लोकांना तो 'कट्ट घालूनि (संघटित करून) राजकारणा । लोक लावी.' आणि अशा रीतीने समुदाय मोठा झाला की 'लोकी लोभ वाढविले, (शिष्याने शिष्य वाढविले) तेणे अमर्याद झाले, (प्रचंड संघटना झाली) की मग- भूमंडळी सत्ता चाले.'

मग काय उणे ?
 लोक संघटित झाले, त्यांचा समुदाव झाला तरच भाग्य येते, ऐश्वर्य लाभते. 'राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे ।', 'जो मानला बहुतासी, कोणी बोलो न सके त्यासी, धगधगीत पुण्यराशी, महापुरुष ।' म्हणून नेत्याने, हे ओळखले पाहिजे की 'जिकडे जग तिकडे जगनायक, कळला पाहिजे विवेक, रात्रंदिवस विवेकी लोक, सांभाळित जाती,' 'जगदांतर निवळत गेले, जगदांतरी सौख्य जाले, मग जाणावे वोळले, विश्वजन,' आणि असे विश्वजन वोळल्यावर, 'जनी जनार्दन वोळला तरी काय उणे तयाला.' (दासबोध दशक १२, समास ९, १२–१०, ११–५, ११–१०, १५–१, १५-२, १९–३, १९-४, १९–७, १२-२) दासबोधाप्रमाणेच स्फुट प्रकरणांतही लोकांना संघटित करून त्यांना राष्ट्रधर्माची दीक्षा देण्याचे, म्हणजे राजकारणाला लावण्याचे महत्त्व समर्थांनी विशद केले आहे.
 'सर्वही पेरणे विद्या । लोकांमध्ये हळूहळू । नेणते जाणते करणे । कथा निरुपणे
 २३