पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३५१
महाराष्ट्रधर्म
 

 सर्व हिंदूंचा, हिंदुधर्माचा आणि म्हणूनच मराठ्यांचा खरा शत्रू कोण याची याप्रमाणे स्पष्ट जाणीव देऊन या शत्रूने काय भयंकर जुलूम या देशात चालविला आहे हे परोपरीने समर्थांनी लोकांना सांगितले आहे. त्यांनी असंतोष जागृत केला तो या मार्गांनी.

परचक्र
 'परचक्र निरूपण नाम समास' या प्रकरणात लोकांच्या हलाखीचे त्यांनी वर्णन केले आहे. 'पदार्थमात्र तितुका गेला । नुस्ता देशचि उरला । येणे कारणे बहुताला । संकट झाले ॥ माणसा खावया अन्न । नाही अंथरूण पांघरूण तेही नाही । घर कराया सामग्री नाही । काय करिती ?' दुसऱ्या एका प्रकरणात यापेक्षाही भयंकर प्रकार काय चालतात ते सांगितले आहे. हे सुलतान लोकांचे नाककान कापतात, त्यांना नदीत बुडवितात, पैशाकरता त्यांची पोटे फाडतात आणि या लूटमारीत स्त्रियांनाही भ्रष्टवितात. यांनी किती एक गुज्रिणी, ब्राह्मणी भ्रष्टविल्या, कित्येक स्त्रियांना जहाजावर नेऊन त्यांची विटंबना केली आणि कित्येक स्त्रियांना देशांतरी नेऊन विकून टाकले. दासबोधातही तिसऱ्या दशकातील पाचव्या व सातव्या समासात वारंवार परचक्राचा आणि सुलतानीचा निर्देश आहे.
 अशा रीतीने परचक्र निरूपण करून, यावनी राज्यातील अस्मानी-सुलतानीचे पुनः पुन्हा वर्णन करून, समर्थांनी प्रथम लोकांमध्ये परिस्थितीची चीड निर्माण केली. सर्वांच्या समान शत्रूची जाणीव ही ऐक्याला, संघटनेला पोषक ठरते. तीतूनच राष्ट्रभावनेचा परिपोष होतो. समर्थांना या भूमीत राष्ट्र निर्माण करावयाचे असल्यामुळे त्यांनी ती जाणीव प्रथम निर्माण केली.

युद्धातून राष्ट्र
 समान शत्रुत्वाची जाणीव आणि त्या शत्रूशी दिलेला लढा यातूनच राष्ट्र निर्माण होते, असा जगाचा इतिहास आहे. इंग्लंड व फ्रान्स ही दोन राष्ट्र निर्माण झाली ती त्या दोन राष्ट्रांत, चौदाव्या- पंधराव्या शतकात, जे 'शतवार्षिक युद्ध' झाले त्यातून झाली. गेल्या शतकात इटली व जर्मनी ही दोन युरोपीय राष्ट्र ऑस्ट्रिया व फ्रान्स यांशी केलेल्या युद्धातून निर्माण झाली. जपान, चीन, तुर्कस्थान, भारत ही राष्ट्रे आक्रमक, साम्राज्यवादी सत्तांशी केलेल्या लढ्यांतूनच निर्माण झाली आहेत. इतरांपासून पृथक व स्वसमाजात सामुदायिक असा अहंकार निर्माण होणे हे राष्ट्रसंघटनेस अवश्य असते. तसा तो द्विविध अहंकार निर्माण झाल्यामुळेच ही राष्ट्रे निर्माण झाली. समर्थांना महाराष्ट्रात राष्ट्र निर्माण करावयाचे होते. त्यासाठी हा द्विविध अहंकार जागृत करणे अवश्य होते. बहामनी सुलतानांनी चालविलेल्या भयानक अत्याचारांची जाणीव देऊन त्यांनी मराठ्यांना प्रथम आपणां सर्वांचा म्लेंच्छ हा शत्रू आहे, आपण निराळे आहोत