पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३५०
 

मान्यांच्या आधी या देशात असंतोष नव्हता असे नाही. भयानक दारिद्र्य, रोगराई, दुष्काळ, जुलूम, पिळणूक यांनी लोक अगदी गांजून गेले होते. त्यांच्यात संतोष कसा असणार ? सगळा असंतोषच होता. पण तो असंतोष अगतिक होता. नशिबाला हात लावून लोक मनाशी चरफडत बसले होते. कमालीच्या निराशेने त्यांना घेरले होते. अशा स्थितीत आपले दैन्य, दारिद्र्य, दुःख हे परकी राज्यामुळे आलेले आहे, ब्रिटिश सत्ताधारी याला कारण आहेत, त्यांना आपण घालवून दिले तर येथे समृद्धी, सुख येईल, हे लोकमान्यांनी सांगितले, लोकांच्या चित्तात आशा निर्माण केली व त्यांना स्वराज्यप्राप्तीच्या उद्योगास सिद्ध केले.

म्लेंच्छ दुर्जन
 अडीचशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासस्वामींनी हेच केले. म्लेच्छ सत्ताधाऱ्यांनी चालविलेल्या सुलतानीचे रूप त्यांनी अनेक प्रकारे लोकांना विवरून सांगितले. त्यांनी भागवतधर्मीय संतांच्याप्रमाणे रामाच्या, मारुतीच्या कथांतून ते अप्रत्यक्षपणे तर सांगितलेच, पण प्रत्यक्ष लोकांच्या डोळ्यांसमोर घडत असलेल्या घटनांचे वर्णन करून आणि यावनी सत्तेचा पुनः पुन्हा निर्देश करून लोकांना त्यांनी त्या अस्मानी सुलतानीची यथार्थ कल्पना दिली.

म्लेंच्छ दुर्जन उदंड । बहुता दिवसांचे माजले बंड ।
या कारणे अखंड । सावधान असावे ॥ (दासबोध, १२-६-१२)

या शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात आक्रमक शत्रूचा समर्थांनी स्पष्ट निर्देश केला आहे. राज्य नेले म्लेंच्छ क्षेत्री, गुरुत्व गेले कुपात्री । आपण अरत्री ना परत्री, काहीच नाही (दास, १४-७-३६). असा, ब्राह्मणांच्या अधःपातावर कडक टीका करताना, मुस्लिम सत्तेचा उल्लेख आलेला आहे. समर्थांचे एक शिष्य दिनकर गोसावी यांनी 'स्वानुभव दिनकर' या आपल्या ग्रंथात समर्थांनी केलेले परिस्थितीचे वर्णन दिले आहे. समर्थ म्हणतात, ज्या युगात यवन राजा आहे तेथे देव बुडाले तर नवल कसले ? सध्याचा राजा देवद्रोही आहे. त्यामुळे पृथ्वी हलकल्लोळ झाली आहे. या यवनांनी कुळस्त्रिया भ्रष्टविल्या आहेत आणि तीर्थक्षेत्रे सर्व उच्छेदिली आहेत. संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात तर, बहुत लोक मेळवावे, एक विचारे भरावे, कष्टे करूनि घसरावे, म्लेंच्छावरी, आणि जिकडे तिकडे महाराष्ट्र राज्य करावे, असा, मुस्लिमांवर प्रत्याक्रमण करावे म्हणून, उघड उपदेश केलेला आहे. आनंदवन भुवन म्हणून समर्थांचे एक काव्य प्रसिद्ध आहे. आपल्या उद्योगाच्या प्रारंभीच त्यांनी हे लिहिलेले आहे. त्यात त्यांनी आपल्याला पडलेल्या एका स्वप्नाचे वर्णन करून मनातल्या आकांक्षा व्यक्त केल्या आहेत. समर्थांची सर्वात मोठी आकांक्षा कोणती ?

बुडाला औरंग्या पापी । म्लेंच्छ संहार जाहला ।
मोडली मांडली क्षेत्रे । आनंदवन भुवनी ॥