पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३४६
 

लागतील. या रीतीने समर्थांच्या महाराष्ट्रधर्माचे रूप निश्चित करावयाचे असल्यामुळे राजवाडे, डॉ. भांडारकर, राजारामशास्त्री भागवत, गो. स. सरदेसाई यांच्या मतांची चर्चा येथे केलेली नाही. न्या. मू. रानडे यांच्या मताचा उल्लेख वर केलाच आहे. अलीकडे डॉ. शं. दा. पेंडसे यांनी 'राजगुरु समर्थ रामदास' या नावाचा उत्कृष्ट ग्रंथ लिहिला आहे. त्यांनी ग्रंथाच्या उत्तरार्धात समर्थांच्या कार्याचे सविस्तर वर्णन केले आहे. हा सर्व महाराष्ट्रधर्म होय, असे त्यांनी कोठे म्हटलेले नाही. पण आरंभी, 'आता प्रस्तुत खण्डात, राजगुरु समर्थ रामदास यांच्या वाङ्मयाच्या आधारे, भागवत धर्माने आतापर्यंत स्वीकारलेले संरक्षक धोरण टाकून चढाऊ व लढाऊ महाराष्ट्रधर्माचे स्वरूप कसे धारण केले, ते पाहावयाचे आहे' असे म्हटले आहे. त्यांनी ग्रंथात केलेल्या विवरणावरून महाराष्ट्रधर्म म्हणजे 'पेट्रिऑटिझम', 'नॅशनॅलिझम' किंवा राष्ट्रधर्म असाच अर्थ त्यांच्या मनात आहे असे दिसते. पुढील विवेचनात मला त्यांच्या ग्रंथाचा फारच उपयोग झाला.

(१) ऐश्वर्याकांक्षा
 ऐहिक ऐश्वर्याची उत्कट आकांक्षा हे राष्ट्रधर्माचे आणि म्हणूनच समर्थांच्या महाराष्ट्रधर्माचे पहिले लक्षण आहे. विल ड्युरंटच्या वचनाचा मागे निर्देश केलाच आहे. पश्चिम युरोपात लोक इहवादी होऊ लागले तेव्हाच त्यांच्या ठायी राष्ट्रनिष्ठा निर्माण झाली. भारतात इ. सनाच्या नवव्या दहाव्या शतकापर्यंत प्रवृत्तिप्रेरणा जिवंत होत्या. त्या काळात शक, यवन, हूण, युएची यांची लक्ष लक्ष संख्येने आलेली आक्रमणे निर्दाळून टाकणारे चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, विक्रमादित्य, हर्ष, पुलकेशी असे सम्राट सारखे उदयास येत होते. नागार्जुन, आर्यभट्ट, लल्ल, वराहमिहीर यांसारखे शास्त्रज्ञ विद्यासाधन करीत होते. काव्य, नृत्य, नाट्य, शिल्प, चित्र, संगीत इ. कलांचा सारखा उत्कर्ष होत होता. येथले व्यापारी जगभर फिरून संपत्ती आणीत होते. याच काळात जावा सुमात्रा इ. आग्नेय आशियाई देशांत भारतीयांनी साम्राज्ये स्थापिली होती. सिरिया, इराक, आरेबिया, इजिप्त इ. देशांत गणित, ज्योतिष, वैद्यक या विद्या येथले पंडित जाऊन शिकवत असत. पण सातव्या शतकात श्री शंकराचार्यांचा निवृत्तिवाद उदयास आला. कुमारिल भट्टांचा शब्दप्रामाण्यवाद पंडितांनी स्वीकारला आणि भारताच्या अवनतीस प्रारंभ झाला. ते वाद हळूहळू समाजमनात भिनू लागले आणि इ. सनाच्या अकराव्या शतकापासून भारतात जिवंतपणाची लक्षणे दिसेनाशी झाली. ती पुन्हा दिसावी, ऐहिक ऐश्वर्य पुन्हा भारताला प्राप्त व्हावे अशी समर्थांची आकांक्षा होती. म्हणूनच ते सांगू लागले - मराठ्यांनी कसे व्हावे? - भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत, विचारवंत, यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्यवंत, सुकृती, विद्यावंत, कलावंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत, कुळवंत, बळवंत, युक्तिवंत, धारिष्टवंत, बुद्धिवंत- या उत्तम गुणांनाच समर्थांनी सद्विद्या म्हटले