पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४७
महाराष्ट्रधर्म
 

आहे. 'ही सर्वत्रांपासी असावी, परी विरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्यरूप.' समर्थ म्हणतात, 'रूपलावण्य हे काही प्रयत्नाने मिळत नाही. पण हे अगांतुक गुण अभ्यासाने प्राप्त होऊ शकतात. म्हणून 'त्यांची काही तरी सोये धरावी' (दास २-८) .

नाना विद्या
 श्रवणभक्तीचा महिमा सांगताना पुन्हा त्यांनी हेच उत्कट, भव्य जीवन मराठ्यांनी जगावे असा उपदेश केला आहे. 'नाना पिंडरचना, भूगोलरचना, नाना सृष्टीची रचना कैसी ते ऐकावी. चन्द्रसूर्य, तारामंडळे, ग्रहमंडळे, मेघमंडळे, रागज्ञान, तालज्ञान, नृत्यज्ञान, वाद्यज्ञान, नाना वल्ली, नाना औषधी, धातु रसायण बुद्धी - ऐसे हे अवघेचि ऐकावे.' (दासबोध, ४-१)

उत्तम गुण
 दासबोध दशक नवले, समास चवथा पाहा. प्रारंभीच समर्थ म्हणतात, पृथ्वीमध्ये कोणी संपन्न असतात, कोणी दारिद्री, कोणी सबळ, कोणी दुर्बळ, कोणी राजवैभव भाेगतात, कोणी दारिद्रय, कोणी उत्तम असतात, कोणी अधम- असे का व्हावे ? 'ऐसे काय निमित्य झाले, हे मज पाहिजे निरोपिले, याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती.' अशी प्रस्तावना करून समर्थ म्हणतात, 'जे गुणसंपन्न आहेत ते भाग्यश्री भोगिती, अवगुणासी दरिद्रप्राती, यदर्थी संदेह नाही.' माणसांना आपापल्या गुणांप्रमाणे भाग्य किंवा दारिद्र्य प्राप्त होते. हे गुण कोणते ? मुख्य गुण विद्या, जाणपण हा होय. 'जैसी विद्या तैसे वैभव.' बुद्धी, विवेक, साक्षेप, कुशलता, व्याप करण्याचे सामर्थ्य या गुणांनी वैभव प्राप्त होते. समर्थांनी यांनाच अगांतुक गुण, प्रयत्नसाध्य गुण म्हटले आहे. हे गुण असतील तो जाणता. या जाणत्यालाच सर्व वैभव लाभते.' नेणता तो करंटा, दैन्यवाणा' विद्या अभ्यासताना 'माया, ब्रह्म, परलोक याबरोबरच राजकारणाचाही अभ्यास करावा. तो नसेल तर सर्वत्र अपमान होतो.' विद्येचा, अगांतुक गुणांचा असा महिमा आहे ! 'गुण नस्ता जिणे व्यर्थ, प्राणिमात्रांचे.' गुण नाही तर गौरव नाही, सामर्थ्य नाही, व्याप नाही. 'व्याप नाही म्हणजे वैभव नाही प्राणिमात्रासी.' 'या कारणे उत्तम गुण तेचि भाग्याचे लक्षण !'

( २ ) प्रपंच
 महाराष्ट्राचा प्रपंच असा वैभवाचा, समृद्धीचा व्हावा ही समर्थांची तळमळ होती. परमार्थ, मोक्ष त्यांना कमी महत्त्वाचा वाटत होता असे नाही. पण महाभारतकारांप्रमाणे इहलोकीचे ऐश्वर्य, बल, सामर्थ्य यांवरच परलोकसिद्धी अवलंबून असते असे त्यांचे ठाम मत होते. म्हणूनच त्यांनी स्पष्टपणे सांगण्यास प्रारंभ केला की 'आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका.' ' प्रपंच सांडूनिया परमार्थ