पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४५
महाराष्ट्रधर्म
 

होती. आणि त्यामुळे त्या त्या देशांच्या स्वतंत्र अस्मिता, त्यांचे पृथगहंकार सिद्ध होत आले होते. ग्रीक विद्येचे त्याच काळात पुनरुज्जीवन झाले. आणि त्यामुळे, तोपर्यंत लोकांच्या मनावर परमार्थ, परलोक यांची जी पकड होती ती ढिली झाली. विल ड्यूरंट या थोर इतिहासपंडिताने स्पष्ट सांगून ठेवले आहे की परलोकचिंता जेथे कमी झाली तेथेच राष्ट्रसंघटना होऊ शकली. पश्चिम युरोपातील सर्वच देशांत देशभाषांचा उदय झाला होता तरी स्पेन, इटली, पोलंड या देशांतील लोकांच्या मनावरची धर्मसत्तेची पकड कमी झाली नाही. ते पुरेसे इहवादी व बुद्धिवादी झाले नाहीत. त्यामुळे तेथे राष्ट्रधर्माचा व्हावा तसा परिपोष झाला नाही. इंग्लंड, फ्रान्समध्ये तो झाला, म्हणूनच ते देश बलाढ्य होऊ शकले.
 भारतात याच काळी देशभाषा प्रौढत्वाला येत होत्या. पण येथे ग्रीक विद्या किंवा दुसरी इहवादी, बुद्धिवादी विद्या आली नाही. त्यामुळे पश्चिम युरोपप्रमाणे येथे राष्ट्रनिर्मिती झाली नाही. याला अपवाद फक्त महाराष्ट्र. महाराष्ट्रात, काही प्रमाणात, इहवाद आणि बुद्धिवाद निर्माण झाला, म्हणून येथे काही प्रमाणात राष्ट्रसंघटना होऊ शकली. त्याचे श्रेय शिव-समर्थांना आहे. त्यांतील समर्थांच्या कार्याचा आता विचार करू.
 संतांनी या देशाला भागवतधर्म शिकविला, तर समर्थांनी महाराष्ट्रधर्म शिकविला, असे बहुतेक सर्व पंडित म्हणतात. पण जवळ जवळ प्रत्येक पंडिताच्या मनातील महाराष्ट्रधर्म याचा अर्थ निराळा आहे. म्हणून समर्थांचा अर्थ निश्चित करणे अवश्य आहे

संरक्षक आणि आक्रमक
 समर्थांच्या आधी महाराष्ट्रधर्म हा शब्द या भूमीत दोन तीनशे वर्षे रूढ होता. पण त्याचा अर्थ अगदी निराळा होता. महिकावतीच्या बखरीत (इ. स. १३७०) प्रथम याचा उल्लेख आढळतो. पण तेथे त्याचा अर्थ कुळाचार, वंशाचार (जातींचे आचार), देशाचार, वेदशास्त्राचार एवढाच आहे. स्नानसंध्या, जप, उपासना, व्रते, सण, उत्सव, सोळा संस्कार हे या आचारांत येतात. गुरुचरित्रात महाराष्ट्रधर्माचा उल्लेख आहे. पण तेथेही वेदप्रामाण्य, वर्णाश्रमधर्म, सदाचार, व्रत-वैकल्ये इतकाच अर्थ आहे. समर्थांनी उपदेशिलेला महाराष्ट्रधर्म तो हा नव्हे. न्या. मू. रानडे यांच्या मते 'पेट्रिऑटिझम' हा समर्थांच्या महाराष्ट्रधर्माचा अर्थ आहे. मला तोच अर्थ योग्य वाटतो. समर्थांनी शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात, 'महाराष्ट्रधर्म राहिला काही तुम्हां कारणे', असा आणि संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात, 'आपला महाराष्ट्रधर्म वाढवावा', असा दोनदा या धर्माचा उल्लेख केला आहे. पण त्यांनी त्याची व्याख्या किंवा त्याच्या आशयाचे स्पष्टीकरण स्वतंत्र असे कोठे केलेले नाही. त्यांचे वाङ्मय आणि त्यांचे कार्य यावरून आपल्याला त्या धर्माची लक्षणे निश्चित करावी