पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१७.
महाराष्ट्रधर्म
 



मराठ्यांचे सामर्थ्य

 हिंदुस्थानावर अकराव्या शतकाच्या प्रारंभापासून वायव्येकडून मुस्लिमांची आक्रमणे सुरू झाली. तेराव्या शतकाच्या प्रारंभी तर दिल्लीला मुस्लिम राज्यच स्थापन झाले आणि पुढील शतकात मुस्लिमांनी सर्व हिंदुस्थान व्यापला. या मुस्लिमसत्तेचा प्रतिकार रजपूत, विजयनगर, शीख व मराठे यांनी केला. या चौघांपैकी या मुस्लिमसत्तेची पाळेमुळे खणून काढून अखिल भारत मुक्त करण्यात मराठ्यांनाच फक्त यश आले. असे का व्हावे, मराठ्यांच्याच ठायी हे सामर्थ कोठून आले, असा प्रश्न इतिहासात नेहमी विचारला जातो. समर्थ रामदास स्वामी आणि शिवछत्रपती यांनी महाराष्ट्रात राष्ट्र निर्माण केले. मराठ्यांना राष्ट्रधर्माची दीक्षा दिली, हे त्याचे कारण होय. रजपूत, कन्नड (विजयनगर), शीख हे पराक्रमी होते. भारत त्यांचा कायमचा ऋणी आहे. यात शंका नाही. पण वर सांगितल्याप्रमाणे त्यांना मुस्लिमसत्ता कायमची निर्दाळून टाकण्यात यश आले नाही हे खरेच आहे. आणि याचे कारण राष्ट्रधर्माची दीक्षा त्यांना कोणी दिली नाही हे आहे. मराठ्यांना ही दीक्षा शिव-समर्थांनी दिली, म्हणूनच ते यशस्वी झाले. या दोन महापुरुषांपैकी समर्थांच्या कार्याचा या प्रकरणात विचार करावयाचा आहे.

इहवाद व राष्ट्रधर्म
 युरोपात चौदाव्या शतकात राष्ट्रधर्माचा उदय झाला. तोपर्यंत इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोलंड या देशात इंग्लिश, फ्रेंच, जर्मन इ. भाषांना प्रौढता आली