पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४३
संतकार्य-चिकित्सा
 

केला तर, 'धर्मभावना सतत जागृत ठेवून हिंदूंच्या अस्मितेची त्यांनी अखंड जपणूक केली आणि मराठीचा अभिमान धरून, त्या भाषेत ग्रंथ निर्मिती करून, महाराष्ट्राला महाराष्ट्ररूप प्राप्त करून दिले. या त्यांच्या कार्याची महती आपल्या ध्यानात येईल.
 यादवकालातील नेतृत्वाचा विचार येथे संपला. आता त्याच्या समारोपादाखल काही थोडे लिहून मग समर्थ रामदास स्वामींच्या कार्याचे स्वरूप पाहावयाचे आहे.
 मागे सातवाहन ते यादव या कालखंडाचा अभ्यास करताना हिंदुसमाजाच्या अवनतीची मीमांसा केली होती. यादव काळाच्या उत्तरार्धात या समाजाची जीवशक्तीच नष्ट झाली होती. या अधःपाताची कारणे कोणती ? निवृत्ती किंवा संन्यासवाद हे पहिले कारण. या निवृत्तीमुळेच राजधर्म, भौतिक विद्या, उद्योग, व्यापार यांची हेळसांड झाली आणि हळूहळू भारतातून त्यांचा लोप झाला. कलियुगाची घातकी कल्पना व तज्जन्य प्रारब्धवाद हे दुसरे कारण. मीमांसकांचे शब्दप्रामाण्य व पुढे त्यातून उद्भवलेले गुरुमाहात्म्य हे तिसरे कारण. कलिवर्ज्य या महामूढ धर्मग्रंथाने हिंदूंच्या समुद्रप्रवासास व परदेशगमनास बंदी घातली आणि या विपरीतबुद्धी समाजाने मानली हे चौथे कारण. याच कलिवर्ज्याने पतितपरावर्तनास म्हणजे धर्मांतरितांच्या शुद्धीसही बंदी घातली आणि तीही या समाजाने मानली हे पाचवे कारण. आणि वर्णभेद, जातिभेद, अस्पृश्यता यांच्याविषयी थोडे उदार, थोडे लवचिक असे पूर्वीच्या शास्त्राने सांगितलेले धोरण लोप पावून त्यांना अत्यंत कडक व तीव्र रूप प्राप्त झाले हे सहावे कारण होय.
 या कारणांमुळे अखिल हिंदुसमाज क्षीणबल झाला आणि इ. स. १००१ पासून सुरू झालेल्या मुस्लिम आक्रमणास त्याला यशस्वीपणे तोंड देता आले नाही. येथील साम्राज्ये पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि इ. स. १३२० च्या सुमारास अखिल भारत यवनाक्रांत झाला. त्याला पूर्ण पारतंत्र्य आले.
 हे आक्रमण विजयनगरच्या साम्राज्य, संस्थापकांनी तत्काळ नष्ट केले आणि जवळ जवळ अडीचशे वर्षे तुंगभद्रेच्या दक्षिणेचे स्वातंत्र्य टिकविले. पण १५६५ साली त्यालाही टिकाव धरता आला नाही. रजपुतांनी दीर्घकाल झगडा केला. पण तेही याच सुमारास नामोहरम झाले. शिखांची तीच गत झाली. महाराष्ट्रात शिवछत्रपतींच्या आगमनापर्यंत संतांच्या धार्मिक चळवळीमुळे स्वत्व टिकून राहिले. पण त्यांच्या धार्मिक तत्त्वज्ञानाला शास्त्रीपंडितांनी जयिष्णू राजधर्माची जोड न दिल्यामुळे येथे परदास्य कायमच राहिले. पण पुढे समर्थ रामदास स्वामी आणि शिवछत्रपती यांनी ही उणीव भरून काढली. त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रधर्माची स्थापना केली. त्यामुळे संतांच्या प्रयत्नांनी जिवंत राहिलेल्या धर्मभावनेला राष्ट्रभावनेची जोड मिळून महाराष्ट्राची जीवशक्ती त्याला पुन्हा प्राप्त झाली आणि त्यामुळे तो मुस्लिम आक्रमणाचा उच्छेद करू शकला. तेव्हा आता प्रथम आपल्या राष्ट्रधर्माचे संस्थापक जे दोन महापुरुष त्यांपैकी समर्थांच्या कार्याचे स्वरूप पाहावयाचे आहे.