पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३४२
 

किती जणांना असेल ? पण त्यांच्या त्या व्यापारी लक्ष्मीवाचून भारतातील लोकसंस्थेचे रक्षण झाले असते काय ? वरील काळात भारतात चाणक्यासारखे अनेक राजनिपुण होऊन गेले. त्यांच्यावाचून सातवाहन, गुप्त, चालुक्य, राष्ट्रकूट यांची साम्राज्ये टिकलीच नसती. आता या राजनीतिनिपुण अमात्यांपैकी आत्मज्ञानी किती असतील ? तरी त्यांच्या विद्येमुळेच भारताचे ऐहिक ऐश्वर्य टिकून राहिले, यात शंकाच नाही. आणि यादवांच्या नंतरच्या तीनशे वर्षात तसे व्यापारी, तसे अमात्य व तसे भास्कराचार्य कोणी झाले नाहीत, म्हणूनच ते ऐश्वर्य नष्ट झाले व ही लोकसंस्थाच विनाशपंथाला लागली, यातही शंका नाही. संतांना ऐहिक ऐश्वर्याची चिंता असती तर त्यांनी या सर्व शास्त्रज्ञांचा, त्यांना आत्मज्ञान आहे की नाही याची काडीमात्र चिंता न करता, महागौरव केला असता. पण तसे त्यांनी केले नाही. यावरून त्यांचे उद्दिष्ट काय होते ते सहज ध्यानात येते.

आदर्श कोण ?
 संतांचे आदर्श पाहिले तर हेच दिसून येते. सर्व वर्णांनी स्वधर्म पाळावा, असा त्यांचा आग्रह होता. तर मग त्या सर्वांच्या स्वधर्माचे आदर्श त्यांनी लोकांपुढे उभे करावयास हवे होते. तसे त्यांनी केले नाही. नामस्मरण करून जे तरून गेले, ज्यांनी देव प्राप्त करून घेतला, त्यांचाच फक्त संत आदर करतात. प्रल्हाद, बळी, सुदाम, उपमन्यू, अजामीळ, पिंगला यांची स्तोत्रे संत गातात. पण हरिहर, बुक्क, विद्यारण्य, कृष्णदेव राय, महाराणा हमीर, महाराणा प्रताप सिंह, भास्कराचार्य, आर्यभट्ट, चंद्रगुप्त, समुद्रगुप्त यांचा संत उल्लेखसुद्धा करीत नाहीत. कालिदास, भवभूती, भारवी यांचा निर्देशही नाही. वास्तविक हे सर्व भगवद्भक्त होते, स्वकर्मकुसुमांनी भगवंतांची पूजा करीत होते, स्वधर्म पाळीत होते. मग यांचा निर्देश संत का करीत नाहीत ?
 तो त्यांचा विषय नाही, हे त्याचे उत्तर आहे. हे सर्व पुरुष ऐहिक ऐश्वर्य उपासक होते. ते राज्य, द्रव्य, मान, उपार्जित होते. यांचा अंतकाळी काही उपयोग नव्हता. परमार्थाच्या वाटेत ते अडसर होते. त्यामुळे संतांनी त्यांची पूर्ण उपेक्षा केली हे उघड आहे.

अन्याय
 संतांच्या कार्याचे विवेचन येथे संपले. त्याचा तात्पर्यार्थ एवढाच सांगावासा वाटतो. की संतांनी जे केले ते फार फार मोठे आहे. फार उदात्त असे आहे, त्यासाठी महाराष्ट्र त्यांचा कायमचा ऋणी राहील. पण त्यांनी जे करावयास हवे होते असे आज आपणास वाटते, ते बळेच त्यांच्या माथी लादणे हे मला युक्त वाटत नाही. कारण त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतो. ऐहिक ऐश्वर्याची चिंता वाहत होते, असे म्हटले तर त्यांच्या प्रतिपादनात अनेक उणिवा, अनेक न्यूने, अनेक विसंगती दिसू लागतात. ते प्रतिपादन अतिशय तोकडे, तुटपुंजे, आणि असमाधानकारक आहे असे दिसू लागते. म्हणून असला अन्याय संतांच्यावर करू नये असे मला वाटते. आणि या दृष्टीने विचार