पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४१
संतकार्य-चिकित्सा
 


धननिंदा
 'मूळ नाशाशी कारण, कनक आणि स्त्री जाण, जो न गुंते येथे सर्वथा, त्याला परमार्थ पुरता॥' असे एकनाथ म्हणतात. यावरून ऐहिक ऐश्वर्य व परमार्थ यात मूलतःच विरोध आहे, असा त्यांचा सिद्धांत होता हे स्पष्ट दिसते. तुकारामांनीही असेच सांगितले आहे. 'धन मिळवोनि कोटी, सवे न ये रे लंगोटी, का आवडे हे प्रियापुत्र धन, कामा काय कोण कोणा आले ? प्रपंच परमार्थ संपादित दोन्ही । एकही निदानी न घडे त्यासी ॥ तुका म्हणे तथा दोही धका । शेवटी तो नरकामाजी पडे ॥'
 शेवटी बरोबर काय येईल, मोक्षाला साधनीभूत काय होईल, हीच संतांची चिंता होती. आणि प्रपंचाला जे उपकारक ते परमार्थाला घातकच ठरणार, याविषयी त्यांना संदेह नव्हता. म्हणूनच धनाचीच नव्हे, तर राज्याची सुद्धा ते निंदा करीत. 'वृत्ति, भूमि, राज्य, द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चिती देव नाही ॥' असे तुकाराम म्हणतात. त्यातील भावार्थ स्पष्ट आहे. देव हवा असेल तर राज्य सोडा, राज्य म्हणजे जमीन; सत्ता हे ऐहिक ऐश्वर्य हवे असेल तर देव सोडा. असा तीव्र विरोध असल्यामुळे समाजाला देवामागे न्यावयाचे असे संतांनी ठरविले व राजधर्भाकडे पाठ फिरविली.

भौतिक विद्या
 भौतिकविद्यांविषयी संतांची जी वृत्ती दिसून येते तिच्यावरूनही हेच दिसून येते की ऐहिक ऐश्वर्य, समाजाची भौतिक प्रगती हे त्यांच्या दृष्टीने अगदी गौण होते. ज्योतिषशास्त्र, तर्कशास्त्र, वैद्यक शास्त्र, शिल्प, व्याकरण, शब्दकोश, काव्यनाटके, वेद, स्मृती, पुराणे यांचा व्यासंग - या सर्व विषयांचे ज्ञान ऐहिक प्रगतीला अवश्य नाही काय ? या सकळ लोकसंस्थेच्या रक्षणासाठी तनमन अर्पून लोकांनी या विद्या हस्तगत करणे अवश्य नाही काय ? पण या विद्यांचा गौरव संतांनी कधीही केला नाही. उलट ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे की हे ज्ञान असले आणि त्या शास्त्रज्ञाला, कलाकाराला, कवीला आत्मज्ञान नसेल तर 'जळो त्याचे ते ज्ञान' (१३-८२९ ते ८३६).

ती चिंता असती तर -
 मनात प्रश्न येतो की असे का ? आर्यभट्ट, लल्ल, वराहमिहिर, नागार्जुन, भास्कराचार्य, पाणिनी, पतंजली यांना आत्मज्ञान नसले तरी त्यांची ती विद्या लोकसंस्थेच्या रक्षणासाठी, ऐहिक उत्कर्षासाठी, ऐश्वर्यासाठी अवश्यच आहे. वेरुळ, अजंठा, कोणार्क, सांची, कारले ही लेणी ज्यांनी निर्माण केली ते काय आत्मज्ञानी होते ? अध्यात्मात त्यांची गती अगदी शून्य असण्याची सुद्धा शक्यता आहे. पण त्यांची कला हे भारताचे ऐश्वर्य आहेच. सातवाहन ते यादव या काळात हजारो भारतीय व्यापारी जगभर हिंडून भारतात सोन्याचा प्रवाह आणून सोडीत होते. त्यांच्यापैकी आत्मज्ञान