पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३३६
 

देवता, गृहस्थाश्रमाची स्वामिनी जी स्त्री, आणि ज्यांच्यासाठी या लोकसंस्थेचे रक्षण करावे असे वाटेल ती मुलेबाळे, यांची फारच निंदा केली आहे. संतांनी ऐहिक ऐश्वर्याचीही चिंता केली या मताचे सर्वात मोठे पुरस्कर्ते म्हणजे डॉ. शं. दा. पेंडसे. त्यांनी 'भागवतोत्तम संत एकनाथ' या आपल्या ग्रंथात, 'भागवताची गालबोटे' असे एक प्रकरण लिहिले आहे. त्यात एकनाथांनी स्त्रियांची जी निंदा केली आहे ती अगदी अप्रशस्त होय असे म्हटले आहे. त्यांच्या मते हे त्यांच्या भागवत धर्मप्रतिपादनाला गालबोट आहे. ते म्हणतात, 'विद्यमान देहाने स्त्रीला पुरुषाइतकाच मोक्ष- संपादनाचा अधिकार असताना, तिची अशी निंदा करणे अप्रशस्त होय.' एकनाथांनी केलेल्या स्त्रीनिंदेची काही उदाहरणे देऊन पेंडसे म्हणतात, 'अकुलीन, कुलीन स्त्रियांची सरसकट केलेली निंदा गृहस्थाश्रमी नाथांच्या भागवताला लागलेले गालबोट आहे.'
 ही टीका डॉ. पेंडसे यांनी एकट्या एकनाथांवरच का केली, असा प्रश्न मनात येतो. कारण सर्वच संतांनी अशी निंदा केली आहे. 'पुत्र पत्नी बंधु सोयरी खाणोरी (चोर), यांचा कोण धरी संग आता ? हो का पुत्र, पत्नी, बंधु त्यांचा तोडावा संबंधु । फोडावे मडके मेल्यालेखी एके घाये ॥' ही तुकारामाची वचने प्रसिद्धच आहेत. नामदेवांनी तर स्त्रीची मोठीच मत्कारिक निंदा केली आहे. एखादी स्त्री सुरेख आहे म्हणूनच ती पापिणी आहे, असे ते म्हणतात. 'लावण्य सुंदर रूपाने बरवी, पापीण कामिनी जाणावी ती ।' उलट जी कुरूप आहे ती धन्य नारी ! 'कायारूप जिचे हिनवट अती, माऊली धन्य ती नारी ॥' (गाथा, पृ. ४९७)

वाढदिवस
 अपत्यलाभ, पुत्रलाभ हा संसारातला मोठा आनंद आणि पराक्रमाची ती मोठी प्रेरणा. पण संतांच्या मते ती सर्वात मोठी हानी होय. तुकाराम म्हणतात की 'देवा, कोणाला संतान व्हावे, किंवा द्रव्य मिळावे, असा आशीर्वाद माझ्या मुखातून येऊ नये. कारण या दोहोंपासून पतनच व्हावयाचे.' मुलाचा वाढदिवस हा घरात मोठा आनंदोत्सव असतो. पण ज्ञानेश्वर असा वाढदिवस करणाऱ्यांचा निषेध करतात. त्यांच्या मते मुलाचा वाढदिवस याचा अर्थ असा की तितका मुलगा मृत्यूच्या जास्त जवळ गेला ! हे ध्यानात न घेता गुढ्या, पताका उभारून लोक मुलाचा वाढदिवस करतात ! (ज्ञा. ९-५१२).
 संसार, स्त्री, पुत्र, यांच्याविषयी खऱ्या भक्ताचे काय धोरण असावे ? संत म्हणतात, वाटेने जाताना वाटसरूला झाडाची सावली दिसते, तितकीसुद्धा आस्था ज्ञानी पुरुषाला घराविषयी वाटत नाही. आपल्या सावलीविषयी आपल्यालाच भान नसते. तसेच स्त्रीविषयीही असावे. आणि आपली जी प्रजा, मुलेबाळे त्यांच्याकडे कसे पाहावे ? वाटेने जाताना वाटसरू, झाडाखाली बसलेल्या गुरांच्याकडे जसे पाहील तसे.