पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३५
संतकार्य-चिकित्सा
 

करावा असे सांगितले आहे, हे खरं. पण वनात जाऊन भक्तीला अवश्य तो वासनाजय होणार नाही म्हणून तू संसारात रहा, एवढाच त्यांचा अभिप्राय आहे. भेदा- भेदभ्रम अमंगळ असे ते नाही का म्हणाले ? पण एक भक्तिमार्ग सोडला तर प्रत्येक क्षेत्रात वर्णभेद, जातिभेद अत्यंत कडक स्वरूपात पाळले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता (हे मागे दाखविलेच आहे). धर्माच्या क्षेत्रातही त्यांना समता मान्य नव्हती. वेदाधिकार त्यांनी सर्वांना दिला नाही. देवळांत सर्वांना प्रवेश नाही. भक्ती करून मोक्ष मिळविण्यास सर्वांना मोकळीक आहे, एवढाच त्यांच्या वर्णसमतेचा अर्थ आहे. तेच त्यांच्या गृहस्थाश्रमाच्या गौरवाचे, संसारात राहावे या उपदेशाचे आहे. त्याला फार मर्यादित अर्थ आहे.

ढेकणाची बाज
 संसारात राहावे, पण त्याची सतत घृणा करावी, त्याची किळस मानावी, असे संत सांगतात. हा सर्व संसार ओकारीसारखा आहे, वमनासारखा आहे, हे विषाचे पात्र आहे, इंगळाचे अंथरूण आहे, असे ज्ञानेश्वर म्हणतात, राज्य, धन, सत्ता, ऐश्वर्य हे सर्व समाजाला सुख मिळविण्यासाठी असते. पण ज्ञानेश्वर म्हणतात, मृत्युलोकात सुख मिळणे अशक्य आहे. राखाेंडीतून जशी ज्वाला निघत नाही तसे संसारातून सुख मिळणार नाही. तुकाराम हेच सांगतात. परमेश्वरप्राप्तीसाठी लौकिक व्यवहार सांडावा लागत नाही, असे ते म्हणतात. पण 'संसारसंगे परमार्थ जोडे, ऐसे काय घडे जाणते ना | ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे !' असे त्यांनी वारंवार बजावले आहे. संसारात राहावे, पण आपले घर, पैसा आणि स्वदेश (स्वदेश सुद्धा) यांचा वीट मानावा, देह आणि देहसंबंधी म्हणजे स्त्रीपुत्रादी यांना निंद्य मानावे, कुत्रे, डुकरे यांनासुद्धा वंदन करावे, पण स्त्रीपुत्रांचा लोभ धरु नये (जोग गाथा, ७५५), असा त्यांचा उपदेश आहे.

संसार X देव
 'नाशवंत धन, नाशवंत मान, नाशवंत स्त्रीपुत्रादिक बाळे' असा निर्वाळा देऊन एकनाथ म्हणतात, 'अरे अशा संसारात राहणे हे गाढवाने उकिरडा फुंकण्यासारखे आहे. मरणाची भीती तू विसरतोस आणि या प्रपंचासाठी व्यर्थ कष्ट करतोस.' नामदेवांनीही, 'संसार करिता देव जरी सापडे, तरी का झाले वेडे सनकादिक ? संसारी जरी देव भेटता, शुकदेव कासया जाती तपालागी ?' असे प्रश्न विचारून हाच अभिप्राय व्यक्त केला आहे.

गालबोट
 संतांनी संसाराची अशी निंदा केलीच आहे. पण त्यापेक्षाही या संसाराची अधिष्ठात्री