पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३७
संतकार्य-चिकित्सा
 


अंतकाळी ?
 स्त्री, पुत्र, मुलेबाळे, आप्तइष्ट यांच्याविषयी अशी दृष्टी का असावी ? संतांनी याचे कारण जे सांगितले आहे त्यावरून त्यांचे उद्दिष्ट काय आहे ते स्पष्ट होते. ते म्हणतात, यांचा अंतकाळी काही उपयोग नाही. एका श्रीपतीखेरीज तेव्हा कोणी साह्यकर्ता नाही. 'तैसा हा संसार पाहता पाहता । अंतकाळी हाता काही नाही ॥'

उद्दिष्ट - मोक्ष
 संतांचा हा विचार अगदी निर्णायक आहे. मोक्षप्राप्ती हे एकच उद्दिष्ट त्यांच्यापुढे आहे. त्यासाठी जे उपयोगी पडतील त्यांचाच फक्त संत गौरव करतात. ऐहिक ऐश्वर्य- प्राप्तीसाठी, गृहस्थाश्रमाच्या सफलतेसाठी स्त्रीपुत्रांचा, आप्तेष्टांचा, लक्ष्मीचा उपयोग होत असेल, पण त्याला संतांच्या मते महत्त्व नाही. कारण त्याची त्यांना पर्वा नाही. त्यांना लोकांना भवसागरातून पैलतीरी न्यावयाचे आहे. त्याला साह्यभूत होणाऱ्यांचेच त्यांना महत्त्व वाटते. असे असताना ऐहिक ऐश्वर्याची चिंता, प्रवृत्तिधर्माची उपासना हे संतांच्या माथी मारण्यात त्यांच्यावर अन्याय होतो असे मला वाटते.

राजधर्म
 तसा अट्टाहास करणाऱ्या पंडितांना एक गोष्ट नम्रपणे सांगावीशी वाटते की संतांना ऐहिक ऐश्वर्याची उपासना सांगावयाची असती तर राजधर्म हाच सर्वांत श्रेष्ठ धर्म होय असे त्यांनी निक्षून सांगितले असते. महाभारतातील थोर धर्मवेत्ते श्रीकृष्ण, व्यास, भीष्म यांनी तर ऐहिकच काय, पण पारलौकिक धर्माच्या दृष्टीनेसुद्धा राजधर्म श्रेष्ठ होय, असे सांगितले आहे.

सर्वा विद्या राजधर्मेषु युक्ताः । सर्व लोका राजधर्मे प्रविष्टाः ।
तस्माद् धर्मा राजधर्माद् विशिष्टो । नान्यो लोके विद्यतेऽजातशत्रो ॥

राजधर्मात सर्व विद्या येतात, सर्व समाज येतो, म्हणून या राजधर्मापेक्षा श्रेष्ठ असा धर्म नाही, असे महाभारतकारांचे मत आहे.
 पुढील वचन जास्त निर्णायक आहे-

यथा राजन् हस्तिपदे पदानि । संलीयन्ते सर्व सत्त्वोद्भवानि ।
एवं धमीन् राजधर्मेषु सर्वान् । सर्वावस्थान् संप्रलीनान् निबोध ॥

हे राजा, हत्तीच्या पावलात इतर सर्व प्राण्यांच्या पावलांचा समावेश होतो, त्याप्रमाणे एका राजधर्मात सर्व धर्मांचा सर्व प्रकारे अंतर्भाव होतो, हे तू पक्के समज.

बल - सामर्थ्य
 संतांना प्रवृत्तिधर्म सांगावयाचा असता तर त्यांनी देशकालपरिस्थितीचे, यवनाक्रांत २२