पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३३४
 

ठेवले होते व त्यासाठी त्यांनी सर्वस्वार्पण केले होते. आणि यासाठीच त्यांची नावे अजरामर झाली आहेत. पण ऐहिक ऐश्वर्याचीही चिंता ते तितकीच वहात असत, असे जेव्हा डॉ. शं. दा. पेंडसे यांच्यासारखे पंडित सांगू लागतात, तेव्हा या विधानाची चिकित्सा करणे प्राप्त होते.

उत्कर्षाची आकांक्षा
 ऐहिक ऐश्वर्याची पहिली प्रेरणा म्हणजे स्त्री, पुत्र, संसार, मुलेबाळे यांच्यावरचे उत्कट प्रेम, त्यांच्याविषयीचे ममत्व, त्यांच्या सुखदुःखाची सतत चिंता, त्यांच्या उन्नतीविषयीची अखंड व्यग्रता आणि याच्या जोडीला वैयक्तिक उत्कर्षाची, कीर्ती, मान, धन, सत्ता यांविषयीची प्रचंड दुर्निवार आकांक्षा ही होय. समाजात सर्व नागरिकांच्या चित्तात ते प्रेम व ही आकांक्षा असल्यावाचून ऐहिक ऐश्वर्य कधीही कोणालाही प्राप्त होत नाही, कधी झालेले नाही. व्यापार करावा, पेढ्या स्थापाव्या, चहूदेशी माल घेऊन फिरावे, आणि अमाप धन मिळवावे, आपले पुत्रपौत्र, वंशज यांच्यासाठी कायमची जिंदगी करून ठेवावी अशी ईर्षा वैश्य, व्यापारी, सावकार, जमीनदार, शेतकरी, यांच्या मनात सतत असली तरच समाजजीवन समृद्ध होते. विद्यापीठे स्थापावी, गणित, ज्योतिष, रसायन, व्याकरण, तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र इ. शास्त्रांचा दीर्घ अभ्यास करावा, आयुर्विद्या, धनुर्विद्या यांचा विकास करून समाजात त्यांचा प्रसार करावा, ही प्रचंड आकांक्षा ब्राह्मणांच्या चित्तात सतत असावयास पाहिजे. वेरूळ अजिंठा यांसारखी लेणी खोदावी, प्रचंड मंदिरे बांधावी, नानाप्रकारचे सुवर्णाचे अलंकार बनवावे, सर्व जगात त्या व इतर अनंत कलाकृती खपवाव्या आणि देशात अमाप धन आणावे ही आकांक्षा कारागीर, कलाकार (त्या काळी यांना शूद्र म्हणत असत) यांच्या ठायी अहर्निश तेवत राहिली पाहिजे. राज्य मिळवावे, साम्राज्य स्थापावे, जगभर लष्करी संचार करून नाना देश जिंकावे, आणि लक्ष्मीचा उपभोग घ्यावा ही विजीगिषा क्षत्रियांच्या ठायी अवश्य आहे. यासाठी या सर्वांच्या ठायी तसा आत्मविश्वास व उग्र अहंभाव असावा लागतो. धन, लक्ष्मी, सत्ता, नाना भोग यांच्या विषयींच्या वासना अत्यंत प्रबळ असाव्या लागतात. समाजाची अशी मनोवृत्ती असल्यावाचून ऐहिक ऐश्वर्याची, राज्यवैभवाची, लक्ष्मी-समृद्धी यांची प्राप्ती केवळ अशक्य आहे.

संसारनिंदा
 हे ऐहिक ऐश्वर्य महाराष्ट्राला लाभावे हे संतांचे उद्दिष्ट असते तर त्यांनी लिहिले त्यापेक्षा फार निराळे वाङ्मय लिहिले असते. त्यांनी अशा तऱ्हेच्या प्रेरणा दिल्या नाहीतच, तर उलट संसाराची व ऐश्वर्याची अत्यंत कडवट अशी निंदा केली आहे आणि या ऐश्वर्याची आकांक्षा धरणाऱ्यांची कमालीची निर्भर्त्सना केली आहे. संतांनी संसार