पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३३
संतकार्य-चिकित्सा
 


(६) ऐहिक ऐश्वर्याची चिंता !
अस्मिता

 ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, व तुकाराम या संतांच्या कार्याचे येथवर विवेचन केले. या थोर पुरुषांनी महाराष्ट्राच्या पारतंत्र्याच्या, विपत्तीच्या काळात स्वधर्मनिष्ठा जागृत ठेवून मराठ्यांच्या स्वत्वाची जपणूक केली हे त्यांचे मुख्य कार्य होय. प्राणिमात्राची पूजा हीच भगवंताची पूजा, या भक्तियोगाचा त्यांनी उपदेश केला. प्रत्येकाने संसारात राहून स्वधर्मप्राप्त कर्म करून त्या कुसुमांनी परमेश्वराची पूजा बांधणे हाच खरा भागवत धर्म, असा त्यांचा सिद्धांत होता. कर्मकांडाचा निषेध करून नीती, चारित्र्य हाच खरा धर्म हे महातत्त्व त्यांनी समाजाला सांगितले. त्याचप्रमाणे वर्णसमता, देवतांचे ऐक्य, भिन्नपंथांतील अभेद, समपरंपरेचा अभिमान यांचा उपदेश करून आणि आपली सर्व प्रवचने करून त्यांनी महाराष्ट्र समाजाला एकरूप करण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्राला स्वतंत्र अस्मिता प्राप्त करून दिली.

प्रवृत्तिवाद ?
 संतांचे हे कार्य निःसंशय अतिशय मोठे आहे. आणि यासाठी महाराष्ट्र त्यांचा कायमचा ऋणी राहील. पण यापलीकडे जाऊन, संत केवळ लोकांच्या पारलौकिक कल्याणाचाच विचार करीत नाहीत, तर ऐहिक ऐश्वर्याचाही विचार करतात, असे काही पंडित सांगू लागले. संत प्रवृत्तिवादी होते, समाजाच्या ऐहिक उत्कर्षाची त्यांनी कधीच उपेक्षा केली नाही, असे कोणी विद्वान आग्रहाने प्रतिपादू लागले म्हणजे मग मनाला जरा संभ्रम पडतो. आणि हे संत प्रवृत्तिवादी असून समर्थ रामदास स्वामी मात्र मूलतः परलोकनिष्ठ होते, असे जेव्हा काही अभ्यासक म्हणू लागतात, तेव्हा ऐहिक ऐश्वर्य, समाजाचा ऐहिक उत्कर्ष, प्रवृत्तिधर्म या शब्दांच्या विवक्षेत काही गफलत होत आहे, असे वाटू लागते.

आखलेले क्षेत्र
 वास्तविक संतांच्या ज्या कार्याचे स्वरूप वर वर्णिले आहे तेवढ्यावरून त्यांचे मोठेपण पुरेसे सिद्ध होत आहे. त्यांच्या अंगावरच्या, चरित्रावरच्या रत्नमाणिकांत आणखी काही भर घातली पाहिजे असे नाही. प्रत्येकाने आपापले क्षेत्र आखून घेतलेले असते आणि काही उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्यासाठी तो तनमन झिजवीत असतो. त्याच्या बाहेर त्याने पाऊल टाकले नाही, इतर क्षेत्रांकडे लक्ष दिले नाही, तर त्याचा काही मोठा दोष आहे, न्यून आहे, असे मानण्याचे कारण नाही. संतांनी मोक्ष, परलोक, भक्तिमार्ग, सत्यअहिंसादी नीतितत्त्वे यांचा उपदेश करून धर्मजागृती करावयाची आणि या जागृतीचे लोण समाजाच्या सर्व थरांत पोचवावयाचे, हे उद्दिष्ट डोळ्यांपुढे