पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३३२
 

दूर पडले आणि मुकुंदराजाच्या विवेकसिंधूचा बहुजनांवर तसा प्रभाव केव्हाच पडला नाही. असे असतानाच ज्ञानेश्वरीचा अवतार झाला आणि मराठीला एकदम मोठी प्रतिष्ठा लाभली. त्या काळी मराठीसारख्या प्राकृत भाषेत ग्रंथ लिहिणे शास्त्रीपंडित मोठे पाप मानीत असत. मराठीत धर्मलेखन करण्यास त्यांचा तीव्र विरोध होता. पण त्याला भीक न घालता अमृताते पैजा जिंकणारी मराठी भाषा ज्ञानेश्वरांनी लिहिली. मराठी ही महाराष्ट्राची राष्ट्रभाषा करून टाकली.

वाग्विलास
 ज्ञानेश्वरांना गीतेतील भागवत धर्माची तत्त्वे बहुजनांपर्यंत पोचवावयाची होती. म्हणून भाषा अत्यंत रम्य आणि वेधक करण्याची त्यांनी प्रतिज्ञाच केली. ती किती यशस्वी झाली? त्यांनीच म्हटले आहे की 'मराठी भाषा देशी खरी, पण तिच्या सौंदर्यामुळे शांतरस शृंगाररसापेक्षाही जास्त आकर्षक होईल. आणि मग मूळ ग्रंथ कोणता आणि टीका कोणती अमा संभ्रम पडेल.' ज्ञानेश्वरांना जबरदस्त आत्मविश्वास होता की मी मराठीत असा वाग्विलास निर्माण करीन की त्यायोगे गीतार्थाने विश्व भरून जाईल आणि जगाला आनंदाचे आवार लाभेल. महाराष्ट्रात त्यानंतर सात आठ शतके गीतार्थ ओतप्रोत भरून राहिला आहे; यावरून त्यांचा आत्मविश्वास किती सार्थ होता हे कळून येईल, अशी ही शब्दश्री मराठीला तिच्या आरंभकाळीच लाभल्याने ज्ञानेश्वरी, मराठी भाषा आणि महाराष्ट्र ही एकरूप होऊन गेली.

आम्ही मराठे
 ज्ञानेश्वरांनंतर महाराष्ट्राचे स्वातंत्र्य गेले आणि मराठी भाषेवर उर्दूचे आक्रमण सुरू झाले. एकनाथांच्या काळी मराठी गद्यात शेकडा सत्तर ऐशीपर्यंत उर्दू शब्द घुसले होते. संस्कृत पंडितांची मराठीविषयीची उपेक्षा बुद्धी पूर्वीसारखीच कायम होती. तेव्हा एकनाथांना मराठीसाठी दुहेरी सामना करावा लागला. पण तो त्यांनी यशस्वीपणे करून मराठीला पुन्हा सन्माननीय स्थान प्राप्त करून दिले. शिवाय भागवत, रामायण, रुक्मिणीस्वयंवर आणि पदे, भारुडे अशी प्रचंड ग्रंथरचना करून त्यांनी मराठीला इतकी समृद्ध करून टाकली की तिच्या सामर्थ्याविषयी पुन्हा कोणी शंका घेऊ नये. याशिवाय ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतील अनेक संत, बहिरा जातवेद, चोंभा, मुक्तेश्वर यांसारखे पंडित कवी यांनी आणि एकनाथानंतर तुकारामांनी मराठीचा अभिमान धरून बहामनी कालात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठी नाद पोचविले, आपण सर्व मराठे आहो, असा एक हुंकार सर्व महाराष्ट्रभर घुमविला आणि महाराष्ट्र व मराठा समाज यांना स्थैर्य, दृढता व एकरूपता प्राप्त करून दिली.