पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३१
संतकार्य-चिकित्सा
 

आरंभी, नमन करताना, त्यांनी, अद्वैत मताचा पुरस्कर्ता जो बृहदारण्यकातील याज्ञवल्क्य, त्याला व्यासवाल्मिकीच्या बरोबरच वंदन केले आहे. एकनाथांच्या काळापर्यंत संस्कृतप्रमाणेच मराठीतही थोर परंपरा निर्माण झाली होती. तिचाही आदर करून एकनाथांनी निवृत्ती, ज्ञानदेव, नामदेव. चांगा वटेश्वर यांनाही प्रारंभी वंदन केले आहे.
 ज्या धर्माच्या रक्षणासाठी तुकारामांना आटी करावयाची होती तो धर्म कोणता होता ? 'वाचा बोलू वेदनीती, करू संता केले ते ॥' या वेदांचा अभिमान त्यांना किती होता ? ते म्हणतात, 'वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा, येरांनी वहावा भार माथा ॥' कारण केवळ पाठांतर करणाऱ्यांना - ब्राह्मणांना - वेदांचे गव्हर कळणार नाही. तुकाराम स्वतः शूद्र होते. जुन्या परंपरेने शूद्रांना हीन लेखिले होते. तरी त्या परंपरेचा अभिमान तुकाराम धरतात, वर्णाश्रमव्यवस्था सांभाळली पाहिजे असे आग्रहाने सांगतात आणि वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण । तयाचे वदन नावलोका ॥' असे बजावतात. त्यांचा प्राणसखा विठ्ठल हा शास्त्रांचे सार आणि वेदांची साक्षात मूर्ती आहे. या प्राचीन परंपरेप्रमाणेच तुकारामांना नव्या मराठी परंपरेचाही अभिमान आहे. ज्ञानेश्वरांना ते ज्ञानियांचा राजा म्हणतात, मायबाप म्हणतात आणि 'मी तुमच्या पोटीचे बाळ आहे, माझी ब्रह्मीची आळ पुरवा', अशी विनवणी करतात. आपले सर्व कवित्व नामदेवांनी दिलेल्या स्फूर्तींमुळेच झाले, अशी त्यांची श्रद्धा होती. आणि एकनाथांना ते जीवीचे जीवन म्हणतात.

चार महापुरुष
 वारकरी पंथाचे हे मोठे सौभाग्य आहे. चार महापुरुष त्या संप्रदायाला लाभले. त्यांपैकी प्रत्येकाचे व्यक्तित्व स्वतंत्र, कणखर, तेजस्वी असे आहे. ते सर्व स्वयंप्रज्ञ आहेत. प्रत्येकांची प्रतिभा त्या स्वयंप्रज्ञेने उजळून निघालेली आहे. आणि तरीही प्रत्येकाची मागीलांवर इतकी उत्कट भक्ती आहे की त्यांच्यात ते विलीन होऊन गेल्यासारखे दिसतात. सर्व एकरूप भासतात. त्या पंथाला जे एक आगळे बळ प्राप्त झाले आणि त्यामुळे महाराष्ट्र जो एकरूप झाला त्याला कारण या चार पुरुषांतील अभेदभाव हे आहे.

(५) मराठी - राष्ट्रभाषा
 एका समान परंपरेचा अभिमान हे जसे समाज एकरूप करण्याचे साधन, तसेच एकभाषा हेही एक प्रभावी साधन आहे. महाराष्ट्राला मराठी भाषा देऊन तिला अतिशय मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे कार्य प्रामुख्याने संतांनी केले. ज्ञानेश्वरांच्या आधी प्रथम मुकुंदराजांनी व नंतर महानुभावांनी मराठीत ग्रंथरचना करण्यास प्रारंभ केला होता. पण महानुभावांचे ग्रंथ लवकरच गुप्त लिपीत गेले आणि समाजापासून